बांधकाम विभागाच्या टेंडरवर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:51 IST2017-10-06T00:51:57+5:302017-10-06T00:51:57+5:30
बांधकाम विभागाच्या टेंडरवर कंत्राटदारांनी बहिष्कार टाकला आहे.

बांधकाम विभागाच्या टेंडरवर बहिष्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : बांधकाम विभागाच्या टेंडरवर कंत्राटदारांनी बहिष्कार टाकला आहे. दोन वेळेस निविदा मागवूनही कुणी टेंडर भरण्यास पुढे न आल्यामुळे रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या कामांना बे्रक लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कंत्राटदार संघटनेने बैठक घेऊन टेंडर न भरण्याचा निर्णय घेतला आहे.
टेंडरमधील खड्डे भरण्याच्या दरांवरून कंत्राटदार संघटना आणि प्रशासनात वाद आहे. याप्रकरणी बांधकाम विभागाचे वरिष्ठ अभियंता काहीही निर्णय घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे दोन वेळा टेंडर रिकॉल करण्यात आले आहेत. तरीही कंत्राटदारांनी टेंडर भरण्यासाठी पुढाकार घेतला नाही. कंत्राटदारांच्या या भूमिकेमुळे ३१ आॅक्टोबरपर्यंत खड्डेमुक्त रस्ते करण्याची बांधकाम विभागाची संकल्पना खड्ड्यात जाणार आहे. बहुतांश जिल्हा मार्गांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे त्यांची डागडुजी करणे गरजेचे आहे. असे असताना कंत्राटदारांनी बहिष्कार टाकल्यामुळे कामे कोण करणार, असा प्रश्न पुढे आला आहे. कंत्राटदार संघटनेच्या सूत्रांनी सांगितले की, अधीक्षक अभियंता कंत्राटदारांच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे टेंडर न भरण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रकरणी अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांच्याशी संपर्क केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.