बांधकाम विभागाची शिरजोरी !
By Admin | Updated: November 5, 2014 00:57 IST2014-11-05T00:24:48+5:302014-11-05T00:57:35+5:30
जालना : शहरातील रामनगर पोलिस वसाहतीमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याने न केलेल्या कामाची देयके उचलूनही कागदांची जुळवाजुळवी केली जात आहे

बांधकाम विभागाची शिरजोरी !
जालना : शहरातील रामनगर पोलिस वसाहतीमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याने न केलेल्या कामाची देयके उचलूनही कागदांची जुळवाजुळवी केली जात आहे. गेल्या १८ वर्षांत एकाही पोलिस वसाहतीमध्ये बांधकाम खात्याने काम केले नाही. मात्र नियमित देयके अदा केली आहेत.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या पोलिसांना मात्र सरकारी वसाहतीमध्ये प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पाणी, स्वच्छता व देखभाल दुरूस्तीअभावी गाळा धारकांची प्रचंड कुचंबना होत आहे.
काही जणांनी तर पदरमोड करून आपल्या गाळ्याची काही प्रमाणात दुरूस्ती करून घेतली आहे.
गाळ्यांतर्गत कामे केली असा देखावा निर्माण केला जात आहे. मात्र बाहेर रस्त्यावर सांडपाणी सोडण्याचा नियम बांधकाम खात्याने तयार केला काय? सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटारी न बांधताही देयके अदा करण्यात आली आहेत. बांधकाम खात्याची ‘आंधळे दळते कुत्रे पीठ खाते’ अशी अवस्था झाली आहे.
तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या काळात सा.बां. च्या कामांची तपासणी झाल्याने या विभागातील कामकाजास काहीसा सुरळीतपणा आला होता.
तशाच प्रकारची तपासणी पुन्हा व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. (प्रतिनिधी)