लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथे जि. प. शाळा इमारत बांधकामाचे बिल थकविल्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांची खुर्ची व संगणक जप्त करण्यात आले. तथापि, या प्रकरणाची निविदा संचिका व मोजमाप पुस्तिकांचा शोध घेतल्यानंतरही त्या फायली बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना चार दिवसांपासून सापडलेल्या नाहीत. सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेच्या इमारत बांधकामासाठी १९९२ रोजी टी. ए. चोपडा यांना कंत्राट मिळाले होते. ३५ लाखांचे ते काम होते. मात्र, त्यावेळी ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार चोपडा यांना काम थांबविण्यास तत्कालीन कनिष्ठ अभियंत्यांनी सांगितले. निविदा संहितेच्या ३ (क) अन्वये विहित मुदतीत अथवा कामाचा दर्जा न राखल्यास संबंधित कंत्राटदारांचे काम रद्द करण्यात येते. या संहितेनुसार चोपडा यांचे काम रद्द करण्यात आले. दरम्यानच्या काळात त्यांना २० ते २४ लाखांचे त्यांचे बिल अदा करण्यात आले होते. त्यांनी उर्वरित बिल मिळावे म्हणून न्यायालयात प्रकरण दाखल केले. खालच्या न्यायालयाचा निकाल जिल्हा परिषदेविरुद्ध लागल्यामुळे प्रशासनाने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. सदरील प्रकरण हे जिल्हा न्यायालयात दाखल करावे, असे खंडपीठाने सूचित केल्यामुळे ते प्रकरण जिल्हा न्यायालयात गेले होेते. यासंदर्भात २७ एप्रिल रोजी जिल्हा न्यायालयाने जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला नोटीस पाठविली व ५ जून रोजी सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहण्याचे कळविले.
बांधकाम विभागाची ‘ती’ फाइल अद्यापही सापडेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:58 IST