गाळे बांधकाम वादाच्या भोवऱ्यात
By Admin | Updated: July 23, 2014 00:32 IST2014-07-23T00:06:22+5:302014-07-23T00:32:41+5:30
सुमेध वाघमारे , तेर जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास निधीतून २०१२ मध्ये ग्रामपंचायतीने गाळे बांधकाम सुरु केले. मात्र या गाळे बांधकामाला पशुसंवर्धन विभगाने विरोध दर्शवत, सदरील जागेवर दावा केला आहे.

गाळे बांधकाम वादाच्या भोवऱ्यात
सुमेध वाघमारे , तेर
जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास निधीतून २०१२ मध्ये ग्रामपंचायतीने गाळे बांधकाम सुरु केले. मात्र या गाळे बांधकामाला पशुसंवर्धन विभगाने विरोध दर्शवत, सदरील जागेवर दावा केला आहे. त्यामुळे हे काम मागील दोन वर्षापासून रखडले आहे. परिणामी ग्रामपंचायतीला गाळ्यासाठी घेतलेल्या कर्जाच्या व्याजावरील भुर्दंड सोसावा लागत आहे.
तेर येथे बाजारपेठेचा विकास व्हावा, या प्रमुख उद्देशाने ग्रामपंचायतीच्या वतीने २०१२ मध्ये जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास निधीतून (डीव्हीडीएफ) कर्जाची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेने १५ लाख रुपये कर्ज मंजुरही केले. ४ फेब्रुवारी २०१२ रोजी ग्रामपंचायतीकडे कर्जाची रक्कम वर्ग करण्यात आली. त्यानंतर २ जुलै रोजी मंजूर रक्कमेपैकी ५ लाख रुपये ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा झाले.
दरम्यान, रक्कम उपलब्ध होताच २५ जुलै २०१२ रोजी ५ गाळ्यांच्या बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. या बांधकामासाठीचे कॉलम उभा करण्यात आल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने या जागेवर आपला हक्क दाखविला. तोवर सदरील कामावर १ लाख ३७ हजार रुपये खर्च झाले होते. एकीकडे ग्रामपंचायत तर दुसरीकडे पशुसंवर्धन विभाग या जागेवर दावा करत असल्यामुळे हे बांधकाम अखेर बंद पडले. दोन वर्षे झाली तरी या जागेचा तिडा सुटलेला नाही. त्यामुळे अद्यापही गाळ्यांचे बांधकाम अर्धवट अवस्थेत पहावयास मिळते. (वार्ताहर)
व्याजापोटी भरले २५ लाख
ग्रामपंचायतीला मंजूर झालेल्या एकूण कर्जापैकी १ लाख ३७ हजार रुपये खर्च झाले आहेत. मात्र व्याज ५ लाख रुपयांचे भरावे लागत आहे. मागील काही दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेने व्याजापोटीचे २५ हजार रुपये भरा, असे पत्र ग्रामपंचायतीला पाठविले होते. त्यानुसार ३ डिसेंबर रोजी २५ हजार रुपये भरले आहेत. एकंदरीतच गाळ्याचे बांधकाम रखडले असले तरी व्याजाचा भुर्दंड मात्र ग्रामपंचायतीला सोसावा लागत आहे. यातून तोडगा काढण्याची गरज व्यक्त होत आहे.