निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या मतदारांची नावे वगळण्याचे षडयंत्र; घोसाळकरांचा आरोप
By बापू सोळुंके | Published: November 22, 2023 03:00 PM2023-11-22T15:00:08+5:302023-11-22T15:00:53+5:30
हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी डोळ्यात तेल घालून काम करावे.
छत्रपती संभाजीनगर : लोकसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगामार्फत नवीन मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. नवीन मतदार याद्या बनविताना कोणाच्या तरी सांगण्यावरून शिवसेनेच्या मतदारांची नावे यादीतून वगळण्यात येत असल्याचे षडयंत्र रचण्यात आले आहे. हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी डोळ्यात तेल घालून काम करावे. वगळण्यात आलेली नावे पुन्हा समाविष्ट करून घ्यावीत, असे निर्देश संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी दिले.
शिवसेना भवन येथे संपर्कप्रमुख घोसाळकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी शिवसेना पक्ष संघटक चेतन कांबळे, मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, राजेंद्र राठोड, माजी महापौर नंदकुमार घोडेले, बंडू ओक, संतोष जेजूरकर, राजू वैद्य, बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, ज्ञानेश्वर डांगे, युवा सेनेचे ऋषिकेश खैरे, महिला आघाडीच्या सुनीता देव, सुनीता आऊलवार आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. घोसाळकर म्हणाले की, मतदार याद्यांमध्ये नावे समाविष्ट करण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून पैसे खर्च करून खासगी एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. या एजन्सीमार्फत घराघरातील मतदारांची नावे, मोबाईल नंबर घेतले जात असून ही सर्व नावे मतदार यादीत समाविष्ट केली जात आहेत. या एजन्सी सत्ताधारी पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करतात.
‘पश्चिम’ची जबाबदारी घोडेले यांच्यावर
माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यावर पश्चिम विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात येत असल्याचे घोसाळकर यांनी जाहीर केले. पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्याकडे लक्ष द्यावे, या मतदारसंघातील बुथनिहाय मतदार याद्यांची तपासणी करून घ्यावी, अशी सूचना त्यांना करण्यात आली.