विविध तंत्रज्ञानाचा एकत्रित विचार व्हावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2016 01:13 IST2016-10-17T00:50:51+5:302016-10-17T01:13:19+5:30
औरंगाबाद : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात अनेक विद्याशाखांचा झपाट्याने विस्तार होत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी विविध तंत्रज्ञानांचा स्वतंत्रपणे विचार न करता

विविध तंत्रज्ञानाचा एकत्रित विचार व्हावा
औरंगाबाद : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात अनेक विद्याशाखांचा झपाट्याने विस्तार होत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी विविध तंत्रज्ञानांचा स्वतंत्रपणे विचार न करता एकत्रित (कनव्हर्जन) अभ्यास करावा. हीच बदलत्या काळाची गरज आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. महेश शिवणकर यांनी केले.
नागसेनवन परिसरातील पीईएस तंत्रनिकेतन महाविद्यालयात ‘कनव्हर्जन आॅफ टेक्नॉलॉजी’ या विषयावर आयोजित राज्यस्तरीय परिसंवादाचे उद्घाटन डॉ. शिवणकर यांच्या हस्ते झाले. या परिसंवादात प्रमुख पाहुणे म्हणून ‘आयआयटी’ खरगपूरचे प्रा. सुशील संवत्सर, ‘आयआयटी’ मुंबईचे वरिष्ठ तंत्रसहायक, नोकियाचे प्रा. ए. पी. परांजपे, अभियंता संदीप दाभाडे आदींची उपस्थिती होती. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य टी. ए. कदम होते. या परिसंवादामध्ये राज्यभरातील अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयांचे सुमारे ३५ प्रतिनिधी सहभागी झाले होते.
यावेळी डॉ. शिवणकर म्हणाले की, तंत्रज्ञानांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी यापुढे सामाजिक व आर्थिक हित जोपासण्यासाठी विविध विद्याशाखांचा एकत्रित अभ्यास करणे हाच पर्याय असेल. या परिसंवादात ‘क्वॉलिटी इन एज्युकेशन, कम्युनिकेशन सिस्टीम अँड आॅप्टीकल नेटवर्क्स तसेच इंजिनिअरिंग अॅप्रोच’ या विषयावर विविध महाविद्यालयांतील सहभागी प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी संवाद साधला. या परिसंवादाचे कनव्हेनर म्हणून प्रा. सतीश सोनवणे, संयोजक समितीचे सचिव प्रा. शिल्पा गायकवाड, समन्वयक प्रा. किरणकुमार पैठणकर, प्रा. महेश आदोडे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन प्रा. नेहा तिडके यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा. नितीन साबणे यांनी मानले.