राष्ट्रवादीच्या जागांवर कॉँग्रेसच्या आज मुलाखती
By Admin | Updated: August 31, 2014 00:43 IST2014-08-31T00:20:41+5:302014-08-31T00:43:21+5:30
शांतीलाल गायकवाड, औरंगाबाद संतप्त काँग्रेसने आता राष्ट्रवादीच्या मतदारसंघांतील काँग्रेस इच्छुकांना मुंबईत पाचारण केले असून, रविवारी दिवसभरात ११४ जागांवरील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

राष्ट्रवादीच्या जागांवर कॉँग्रेसच्या आज मुलाखती
शांतीलाल गायकवाड, औरंगाबाद
राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील सर्वच २८८ जागांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यामुळे संतप्त काँग्रेसने आता राष्ट्रवादीच्या मतदारसंघांतील काँग्रेस इच्छुकांना मुंबईत पाचारण केले असून, रविवारी दिवसभरात ११४ जागांवरील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.
काँग्रेस आघाडीतील विधानसभेच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ९ मतदारसंघांतून इच्छुकांची चाचपणी करून काँग्रेसने दि.१० आॅगस्ट रोजीच या याद्या तयार ठेवल्या होत्या; परंतु आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला सुटलेल्या १७४ जागांसाठीच काँग्रेसने मुलाखती घेतल्या. राष्ट्रवादीने जिल्ह्यातील इच्छुकांची चाचपणी करून दि.२० आॅगस्ट रोजी संपूर्ण मतदारसंघनिहाय याद्या तयार केल्या व सर्वच मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती तीन दिवसांपूर्वीच घेतल्या.
राष्ट्रवादीच्या वाट्याच्या मतदारसंघांतील काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखती आयोजित करून काँग्रेसने राष्ट्रवादीला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे यांनी सांगितले की, राष्ट्रवादीकडील पैठण व गंगापूर-खुलताबाद मतदारसंघांतील काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या नव्हत्या. या दोन्ही मतदारसंघांतील इच्छुकांना पक्षश्रेष्ठींनी मुंबईला बोलावले आहे. त्यानुसार सर्व इच्छुक मुंबईला रवाना झाले आहेत.
शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम यांनी सांगितले की, पक्षाने कालच यासंदर्भातील पत्र पाठवून औरंगाबाद मध्यमधून लढू इच्छिणाऱ्यांना मुंबईला बोलावले आहे. मध्यमधून १२ इच्छुक उमेदवार असून, आम्ही मुंबईला निघालो आहोत. उद्या सकाळी ११.३० वाजता मुलाखती होणार आहेत. राज्यातील ११४ जागांसाठी या मुलाखती होणार आहेत. त्यानंतर सोमवारी (दि.१ सप्टेंबर) आझाद मैदानावर काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे.
काँग्रेसकडून जिल्ह्यात शंभरांहून अधिक इच्छुक
काँग्रेसकडून लढण्याची इच्छा तब्बल शंभरांहून अधिक कार्यकर्त्यांनी पक्षाकडे उमेदवारी दाखल करून यापूर्वीच व्यक्त केली आहे. त्यात एससी प्रवर्गासाठी राखीव पश्चिममधून ३४ इच्छुक आहेत. मध्यमधून १२ व पूर्वमधून ४ इच्छुकांसह उर्वरित सहा मतदारसंघांतून शंभरांहून अधिक कार्यकर्ते स्पर्धेत उतरले आहेत.
जागा वाटपाचा तिढा
आघाडीत जागावाटपाचा तिढा निर्माण झाल्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. सध्याच्या परिस्थितीत आघाडी व युती होणार आहेच, असे कार्यकर्ते छातीठोकपणे सांगतात; परंतु ऐनवेळेस काही बिनसले तर गडबड नको म्हणून हे सर्व सुरू असल्याचे त्यांचे मत आहे.