धोका न पत्करण्याचा काँग्रेस आघाडीचा निर्णय
By Admin | Updated: September 16, 2014 01:36 IST2014-09-16T01:22:58+5:302014-09-16T01:36:59+5:30
औरंगाबाद : बहुमत असूनही सिल्लोड पंचायत समितीत पराभूत व्हावे लागल्यामुळे सावध झालेल्या काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीने रविवारी (दि.२१) जिल्हा परिषद अध्यक्ष,

धोका न पत्करण्याचा काँग्रेस आघाडीचा निर्णय
औरंगाबाद : बहुमत असूनही सिल्लोड पंचायत समितीत पराभूत व्हावे लागल्यामुळे सावध झालेल्या काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीने रविवारी (दि.२१) जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीत अधिक धोका न पत्करता आघाडीच्या २६ सदस्यांना अज्ञातस्थळी पाठविण्याचा निर्णय घेतला. सोमवारी रात्री उशिरा हे सदस्य अज्ञातस्थळी रवाना करण्यात आले.
जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती- उपसभापतीपदांसाठी रविवारी (दि.१४) निवडणूक झाली. १६ सदस्यीय सिल्लोड पंचायत समितीत काँग्रेसचे ७ व राष्ट्रवादीचे २ अशा ९ सदस्यांसह बहुमत होते; परंतु राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांनी अचानक भाजपाशी संगनमत करून आघाडीला हादरा दिला. या धक्क्यामुळे काँग्रेस आघाडीच्या नेत्यांनी रविवारी रात्री आघाडीच्या जि.प. सदस्यांची बैठक बोलावली.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे, पशुसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री अब्दुल सत्तार, आमदार सुभाष झांबड, राष्ट्रवादीचे भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला आघाडीचे २६ सदस्य उपस्थित होते. आघाडीच्या नेत्यांनी सदस्यांची मते जाणून घेतली. कोणताही दगाफटका होण्याऐवजी आघाडीच्या सदस्यांना सहलीवर पाठविण्याचा निर्णय बैठकीत झाला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
काँग्रेसचे गट नेते विनोद तांबे, समाजकल्याण सभापती रामनाथ चोरमले, राष्ट्रवादी रामदास पालोदकर यांनी या वृत्तास दुजोरा दिला. रात्री उशिरा आम्ही शहरातून बाहेर पडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षपदाच्या शर्यतीत विनोद तांबे व श्रीराम महाजन यांची नावे काँग्रेसकडून आघाडीवर आहेत. उपाध्यक्षपदाचा उमेदवार राष्ट्रवादीचा राहणार आहे. अध्यक्षपदाचा उमेदवार काँग्रेसने द्यावा, राष्ट्रवादी उपाध्यक्षाचे नाव सुचविल, असे बैठकीत ठरले.
मनसेचा पाठिंबा आघाडीला कायम राहणार असून त्यांना दोन सभापतीपदे दिली जातील, असेही बैठकीत ठरले आहे.