नारळ फोडून काँग्रेसची प्रचारात आघाडी
By Admin | Updated: February 4, 2017 23:49 IST2017-02-04T23:46:33+5:302017-02-04T23:49:25+5:30
उस्मानाबाद :शनिवारी काँग्रेसच्या राज्याच्या प्रचाराचा शुभारंभ उमरगा तालुक्यातील येणेगूर येथून करण्यात आला.

नारळ फोडून काँग्रेसची प्रचारात आघाडी
उस्मानाबाद : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या रणधुमाळीला वेग आला आहे. शनिवारी काँग्रेसच्या राज्याच्या प्रचाराचा शुभारंभ उमरगा तालुक्यातील येणेगूर येथून करण्यात आला. यानिमित्ताने प्रदेशाध्यक्षांसह दोन माजी मुख्यमंत्री आणि लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनीही मोठी उपस्थिती लावली होती. काँग्रेसच्या या पहिल्याच प्रचारसभेला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादामुळे उमरगा-लोहाऱ्यासह जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे.
प्रचार शुभारंभाच्या या कार्यक्रमात प्रमुख वक्त्यांसह आ. बसवराज पाटील, आ. दिलीपराव देशमुख, आ. मधुकरराव चव्हाण यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. उस्मानाबाद, लातूर हे जिल्हे काँग्रेसवर प्रेम करणारे आहेत. या जिल्ह्याला दिग्गज काँग्रेस नेत्यांची परंपरा असून, काँग्रेससाठीही त्यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या विचारांच्या पाठिशी उस्मानाबादकर कायम राहिल्याचे बसवराज पाटील यांनी सांगितले. जिल्हा परिषद, पंचायत समिती या पंचायतराज व्यवस्थेसोबत काँग्रेसचे वेगळे नाते आहे. ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण काँग्रेसलाच आहे. काँग्रेसच ग्रामीण भागाचा विकास करू शकतो, हा विश्वास असल्याने होवू घातलेल्या निवडणुकीत जिल्हा काँग्रेसच्या पाठिशी उभा राहिलेला दिसेल, असा विश्वासही बसवराज पाटील यांनी व्यक्त केला.
आ. मधुकरराव चव्हाण यांनी आपल्या भाषणात जिल्हा परिषद, पंचायत समितीची ही निवडणूक जिल्ह्यातील कार्यकर्ते एकविचाराने लढवून जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा फेंडा फडकवितील, असा शब्द दिला. सत्ताधाऱ्यांच्या सभांना दोनशे नागरिक सुध्दा उपस्थित नसतात. मात्र, माळरानावर घेतलेल्या काँग्रेसच्या सभेला हजारोंची गर्दी आहे. यावरूनच वारे कोणत्या दिशेने वाहत आहे, याचा प्रत्यय येतो, असे ते म्हणाले. सभेपूर्वी काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी आई तुळजाभवानीला साकडे घालून या निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळू दे, अशी प्रार्थना केल्याची माहितीही त्यांनी आपल्या भाषणात दिली.
आ. दिलीपराव देशमुख यांनी आपल्या भाषणात ग्रामीण भागाच्या प्रश्नांची जाण असलेल्या काँग्रेस उमेदवारांना संधी द्या, असे आवाहन केले. ग्रामीण भागातील सत्तर ते ऐंशी टक्के योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविल्या जातात. त्यामुळे ग्रामीण लोकांशी नाळ असलेल्या काँग्रेसला निवडून देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. केंद्र व राज्यातील सरकारे केवळ जुन्या योजनांची नावे बदलत असून, नोटाबंदीच्या नावाखाली या सरकारने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे केवळ नुकसान केले नाही तर फसवणूकही केली असल्याची टीका केली. घोषणांना भुलून आपण विरोधकांना सत्तेची संधी दिली. मात्र, मूळ प्रश्न विसरलेल्या सत्ताधाऱ्यांना आता जनता कंटाळली असून, याचे उत्तर मतदारांनी मतदानाच्या माध्यमातून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, कार्यक्रमापूर्वी प्रा. शौकत पटेल, जि. प. सदस्य दिलीप भालेराव, माजी सभापती असिफ मुल्ला आदींची भाषणे झाली. सभेला जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील, शैलेश पाटील चाकूरकर, अशोकराव पाटील निलंगेकर, जि. प. अध्यक्ष अॅड. धीरज पाटील, काँग्रेसचे युवा नेते शरण पाटील, सुनील चव्हाण, माजी आ. वैजीनाथ शिंदे, काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. स्मीता शहापूरकर, महिला जिल्हाध्यक्षा डॉ. राजलक्ष्मी गायकवाड, संजय पाटील दुधगावकर, मधुकर तावडे, व्यंकट बेद्रे, अॅड. मोतीपोवळे, श्रीपती काकडे, शेषराव पाटील, सुभाष राजोळे, रफीक तांबोळी, रामकृष्णपंत खरोसेकर, अमोल पाटील, बाबूराव राठोड, सादीकमियाँ काझी, केशव पवार, विठ्ठल बदोले, राजू तोरकडे, गोविंद पाटील, विजय सोनकटाळे, धनराज टिकांबरे, बसवराज कारभारी, शौकत पटेल, दत्ता पाटील, सभापती सिद्रामप्पा दुलंगे, सागर उटगे आदींसह उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील उमेदवारांची उपस्थिती होती.