जि़प़ अध्यक्ष निवडीसंदर्भात काँग्रेसची रणनीती आज ठरणार

By Admin | Updated: September 12, 2014 00:07 IST2014-09-11T23:51:35+5:302014-09-12T00:07:35+5:30

नांदेड : काँग्रेसची व्यूहरचना काय असेल याबाबत उद्या शुक्रवारी काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण जिल्हा परिषद सदस्यांना निर्देश देणार आहेत़

The Congress strategy will be decided today by the Joint President | जि़प़ अध्यक्ष निवडीसंदर्भात काँग्रेसची रणनीती आज ठरणार

जि़प़ अध्यक्ष निवडीसंदर्भात काँग्रेसची रणनीती आज ठरणार

नांदेड : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी काँग्रेसची व्यूहरचना काय असेल याबाबत उद्या शुक्रवारी काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण जिल्हा परिषद सदस्यांना निर्देश देणार आहेत़ अध्यक्षपद निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी काँग्रेस सदस्यांची बैठक बोलावण्यात आली आहे़
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक २१ सप्टेंबर रोजी होणार आहे़ नांदेड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी सुटले आहे़ यात काँग्रेसकडून करखेली गटाच्या सिंधूताई कमळेकर आणि मंगलाताई गुंडिले स्पर्धेत आहेत़
अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भाने खुद्द माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण हेच शुक्रवारी जिल्हा परिषदेत दाखल होत आहेत़ दुपारी ४ वाजता होणाऱ्या या बैठकीत काँग्रेस सदस्यांना बोलावण्यात आले आहे़ या बैठकीत सदस्यांच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने भावना जाणून घेतल्या जाणार आहेत़ त्याचवेळी निवडणुकीत काय रणनिती राहिल याबाबत माजी मुख्यमंत्री चव्हाण हे मार्गदर्शन करणार आहेत़
जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेसच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीसह मित्र पक्षांची सत्ता आहे़ २०१२ मध्ये झालेल्या सत्ता स्थापनेत जिल्हा परिषदेतील उपाध्यक्ष पदासह सभापती पदेही काँग्रेसला मित्र पक्षाला द्यावी लागली आहेत़ याबाबत काँग्रेस सदस्यांमध्ये नाराजी व्यक्त आहे़ जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि समाजकल्याण सभापतीपद वगळता अन्य पदे ही मित्रपक्षाकडेच आहेत़ त्यामुळे सर्वात मोठा पक्ष असूनही सत्तेतील मिळणारा वाटा हा कमी असल्याची भावना निर्माण झाली आहे़
आगामी अडीच वर्षाच्या कालावधीतही काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र राहण्याची चिन्ह आहेत़ काँग्रेसचे जिल्हा परिषदेत २५ सदस्य आहेत़ तर राष्ट्रवादीचे १८ सदस्य आहेत़ सत्ता स्थापनेसाठी ३२ सदस्यांची आवश्यकता राहणार आहे़ त्यामुळे काँग्रेस आघाडी वगळता अन्य पक्षांना सोबत घेण्याची गरज उरणार नाही़ मागील अडीच वर्षाच्या कालावधीत जिल्हा परिषदेत अनेक राजकीय उलथापालथी घडल्या आहेत़ त्यात चिखलीकर गटाच्या सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे़ तर भाजपाच्या ४ सदस्यांचीही गरज उरणार नाही़
त्यात सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिसऱ्या गटानेही काँग्रेसशी जवळीक साधली आहे़ त्यामुळे त्या गटालाही एक पद देण्याची चर्चा सुरू आहे़ राष्ट्रवादीच्या धोंडगे गटाकडून उपाध्यक्षपदाची मागणी केली आहे़ गेल्यावेळी हे पद नाईक गटाकडे होते़
(प्रतिनिधी)

Web Title: The Congress strategy will be decided today by the Joint President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.