अध्यक्षपदी काँग्रेसच्या प्रतिभा पाटील कव्हेकर
By Admin | Updated: September 22, 2014 00:55 IST2014-09-22T00:47:04+5:302014-09-22T00:55:08+5:30
लातूर : लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी काँग्रेसच्या विद्यमान महिला व बालकल्याण सभापती प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांची तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचेच अण्णासाहेब पाटील यांची रविवारी निवड झाली़

अध्यक्षपदी काँग्रेसच्या प्रतिभा पाटील कव्हेकर
लातूर : लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी काँग्रेसच्या विद्यमान महिला व बालकल्याण सभापती प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांची तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचेच अण्णासाहेब पाटील यांची रविवारी निवड झाली़ या निवडीसाठी मतदान होऊन ४१ विरुध्द १३ अशी मते मिळाली़ दरम्यान, मनसेच्या एका सदस्याने काँग्रेसलाच मतदान करुन 'हात' बळकट केले तर राष्ट्रवादीच्या चार सदस्य यावेळी अनुपस्थित राहिले़
लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे यांचा अडीच वर्षांचा कालावधी संपुष्टात आल्याने रविवारी नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी जिल्हा परिषद सदस्यांची विशेष बैठक जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात बोलाविण्यात आली होती़ जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेसची एक हाती सत्ता असून त्यात काँग्रेसचे ३५, राष्ट्रवादीचे ९, भाजपाचे ८, शिवसेनेचे ५ आणि मनसे १ असे पक्षीय बलाबल आहे़
अप्पर जिल्हाधिकारी तथा पीठासन अधिकारी पुरुषोत्तम पाटोदकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरु झालेल्या या निवड बैठकीस ५८ पैकी ५४ सदस्य उपस्थित राहिले़ अध्यक्षपदासाठी काटगाव गटातील काँग्रेसच्या विद्यमान महिला व बालकल्याण सभापती प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांनी आणि हलगरा गटातील भाजपाच्या मधु बिरादार यांनी नामांकनपत्र सादर केले़ तसेच उपाध्यक्षपदासाठी जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा काँग्रेसचे अण्णासाहेब पाटील यांनी आणि शिवसेनेच्या भादा गटातील सविता शिंदे यांनी नामांकनपत्र सादर केले़ हे चारही नामनिर्देशनपत्रे वैध ठरल्याने हात उंचावून मतदान घेण्यात आले़
काँग्रेसच्या प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांना ४१ तर भाजपाच्या बिरादार यांना १३ मते मिळाली़ त्यामुळे अध्यक्षपदासाठीच्या कव्हेकर यांचा विजय झाल्याचे घोषित करण्यात आले़ तसेच उपाध्यक्षपदासाठीचे काँग्रेसचे पाटील यांना ४१ तर शिवसेनेच्या शिंदे यांना १३ मते मिळाली़ त्यामुळे पाटील यांचा निर्विवाद विजय झाला़
ही निवड जाहीर झाल्यानंतर माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या आणि अण्णासाहेब पाटील यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करुन आनंदोत्सव साजरा केला़ नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यासाठी समर्थकांनी एकच गर्दी केली होती़ त्यामुळे सुट्टीच्या दिवशी शुकशुकाट जाणवणारी जिल्हा परिषद रविवारी मात्र गजबजलेली दिसून आली़