महापालिका रणधुमाळीत काँग्रेसची आघाडी

By Admin | Updated: July 13, 2017 00:27 IST2017-07-13T00:22:10+5:302017-07-13T00:27:08+5:30

नांदेड: आरक्षण सोडत आणि प्रभाग रचनेच्या निश्चितीनंतर महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला प्रारंभ झाला असून या रणधुमाळीत महापालिका निवडणुकीच्या रणनीतीत काँग्रेसने आघाडी घेतली आहे़

Congress leadership in Rudhupala | महापालिका रणधुमाळीत काँग्रेसची आघाडी

महापालिका रणधुमाळीत काँग्रेसची आघाडी

अनुराग पोवळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: आरक्षण सोडत आणि प्रभाग रचनेच्या निश्चितीनंतर महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला प्रारंभ झाला असून या रणधुमाळीत महापालिका निवडणुकीच्या रणनीतीत काँग्रेसने आघाडी घेतली आहे़ १४ जुलैपासून काँग्रेसने इच्छुकांचे अर्ज मागवले आहेत़
महापालिका निवडणुकीसाठी १० जुलै रोजी आरक्षण फेरसोडत झाल्यानंतर संपूर्ण २० प्रभागांचे चित्र स्पष्ट झाले़ त्यामुळे इच्छुकही मोठ्या संख्येने पुढे आले आहेत़ काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या नांदेड महापालिकेवर भगवा फडकविण्याचे तसेच नांदेडात कमळ फुलविण्याची तयारी करीत राज्यात सत्ताधारी असलेल्या युतीतील सेना- भाजपाने स्वतंत्रपणे रणनीती आखण्यास प्रारंभ केला आहे़ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोकराव चव्हाण यांच्या टीमनेही महापालिकेवरील आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी संपूर्ण रणनीती आखली आहे़
खा़ चव्हाण यांनी महापालिका निवडणुकांची जबाबदारी ही काँग्रेस महानगराध्यक्ष आ़ अमरनाथ राजूरकर आणि माजी राज्यमंत्री आ़ डी़ पी़ सावंत यांच्यावर दोन महिन्यांपूर्वीच सोपवली होती़ १४ जुलैपासून काँग्रेसने २० प्रभागांमध्ये इच्छुक असलेल्या उमेदवारांचे अर्ज मागितले आहेत़ २४ जुलैपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार असून जातपडताळणी प्रमाणपत्रांसह अर्ज सादर करावे लागणार आहेत़
दुसरीकडे भाजपाच्याही महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बैठका सुरू आहेत़ भाजपाने नांदेड महापालिका निवडणूक प्रभारी म्हणून लातूरमध्ये कमळ फुलवणाऱ्या कामगारमंत्री संभाजी निलंगेकर यांच्यासह सुजितसिंह ठाकूर यांची नियुक्ती केली आहे़ त्यामुळे या निवडणुकीत स्थानिकांचे किती महत्व अबाधित राहील हे आगामी काळातच स्पष्ट होणार आहे़ भाजपाचे निवडणूक प्रभारी कामगारमंत्री निलंगेकर हे २२ जुलै रोजी नांदेडमध्ये येणार असल्याचे सांगण्यात येत आहे़ त्यांच्या नांदेड दौऱ्यानंतरच भाजपाचे निवडणुकीबाबतचे व्हिजन स्पष्ट होणार आहे़ राज्यातील सत्ता आणि लातूरमध्ये अलीकडेच जिंकलेल्या महापालिका निवडणुका यामुळे भाजपाचा उत्साह वाढला आहे़
शिवसेनेचीही एक प्राथमिक बैठक सेनेच्या दोन आमदारांच्या उपस्थितीत पार पडली़ विधानपरिषद निवडणुकीनंतर पहिल्यांदाच या दोन आमदारांची विस्तृत चर्चा झाल्याने शिवसैनिकांनी समाधान व्यक्त केले होते़ सेनेच्या या बैठकीत विद्यमान नगरसेवकांनी आमच्या आहे त्या जागा सोडून युतीवर चर्चा करावी, असा प्रस्ताव नेत्यांसमोर ठेवला़ शिवसेनाही भाजपाशी युती करण्याबाबत सकारात्मक असल्याचे आ़ हेमंत पाटील यांनी सांगितले होते़ दुसरीकडे युतीबाबत भाजपाकडून कोणतीही भूमिका अद्याप स्पष्ट करण्यात आली नाही़
महापालिकेत सत्तेत भागीदार राष्ट्रवादी काँग्रेसकडून मात्र अद्याप कोणत्याही हालचाली सुरू झाल्या नाहीत़ महिनाभरापूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आदींच्या उपस्थितीत नांदेडमध्ये पक्ष संघटन वाढविण्यासंदर्भात बैठक घेतली़ राष्ट्रवादीच्या नांदेड शहरातील स्थितीबाबत खुद्द अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून आगामी काळात तरी पक्ष वाढवा, असा सल्ला दिला होता़ मात्र अद्याप कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत़

Web Title: Congress leadership in Rudhupala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.