भाजपातील गद्दारांना दिल्या कानपिचक्या
By Admin | Updated: November 4, 2014 01:39 IST2014-11-04T01:22:11+5:302014-11-04T01:39:50+5:30
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीनंतर आज पहिल्यांदाच भाजपाने सर्व नगरसेवकांची बैठक घेऊन पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांना कानपिचक्या दिल्या

भाजपातील गद्दारांना दिल्या कानपिचक्या
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीनंतर आज पहिल्यांदाच भाजपाने सर्व नगरसेवकांची बैठक घेऊन पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. बैठकीत कोअर कमिटीपुढे विरोधात काम करणाऱ्यांचा अहवाल देण्याचा निर्णय झाला. तसेच आगामी मनपा निवडणुका स्वबळावर लढण्याबाबत नगरसेवकांची मते बैठकीत जाणून घेण्यात आली.
केंद्रात, राज्यात सत्ता आल्यामुळे पक्षाचा आत्मविश्वास वाढला असून, मनपा निवडणुकीतही पक्षाला नंबर वन करण्यासाठी व्यूहरचना आखण्यात येणार आहे. मनपा निवडणुकीत प्रभाग पद्धतीऐवजी वॉर्डरचना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात येणार आहे.
उस्मानपुरा येथील विभागीय कार्यालयात झालेल्या बैठकीला आ. अतुल सावे, शहराध्यक्ष भगवान घडामोडे, पश्चिम मतदारसंघातून पराभूत झालेले मधुकर सावंत यांच्यासह पालिकेतील नगरसेवकांची उपस्थिती होती. विधानसभा निवडणुकीत पक्षाला जिल्ह्यात पाहिजे तसे यश मिळालेले नाही. फुलंब्री, औरंगाबाद पूर्व आणि गंगापूर मतदारसंघात पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र, उर्वरित सहा मतदारसंघांत थोड्याफार फरकाने पक्षाचे उमेदवार पडले. त्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटन वाढविण्यासाठी आणि सदस्य नोंदणीवर भर देण्याचा निर्णय बैठकीत झाला. पश्चिम मतदारसंघातील नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी उमेदवार सावंत यांच्या विरोधात काम केल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला.
विधानसभेत ज्यांनी पक्ष उमेदवाराच्या विरोधात काम केले. त्यांचा सी.आर. खराब करून त्याचा अहवाल कोअर कमिटीला देऊ. अशा धमक्या शहराध्यक्ष भगवान घडामोडे यांनी दिल्या.
४यामुळे पक्षविरोधात काम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. ज्या मतदारसंघात उमेदवार विजयी झालेत तेथील संघटन आणखी मजबूत करण्यासाठी विचार केला जाणार आहे.
आ. सावे म्हणाले...
४सदस्य नोंदणी वाढविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. २० टक्के मतदारांची नोंदणी करून घेणे बाकी आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाला फार अटीतटीचा सामना करावा लागला. मनपा निवडणुका आता समोर आहेत.
४पालिकेत यश मिळविण्यासाठी मेहनतीने काम करावे लागणार आहे. पक्षविरोधात काम करणाऱ्यांवर कारवाईबाबत कोअर कमिटी निर्णय घेईल, असे आ. अतुल सावे यांनी सांगितले.