राकाँने दाखविला काँग्रेसलाच ‘हात’
By Admin | Updated: October 31, 2014 00:35 IST2014-10-31T00:08:09+5:302014-10-31T00:35:49+5:30
बीड : काँग्रेसच्या एकमेव सदस्या आशा दौंड यांच्या ‘हात’भारामुळे संख्याबळ बरोबरीत आणता आलेल्या राष्ट्रवादीने नशिबाने जिल्हा परिषदेची सत्ता राखली.

राकाँने दाखविला काँग्रेसलाच ‘हात’
बीड : काँग्रेसच्या एकमेव सदस्या आशा दौंड यांच्या ‘हात’भारामुळे संख्याबळ बरोबरीत आणता आलेल्या राष्ट्रवादीने नशिबाने जिल्हा परिषदेची सत्ता राखली. मात्र ज्या काँग्रेसच्या मदतीने राष्ट्रवादीने जि.प.ची सत्ता राखली त्याच काँग्रेसला राष्ट्रवादीने गुरुवारी सर्वसाधारण सभेच्या बैठकीत चांगलाच हात दाखविला. परंपरेने उपाध्यक्षांकडे असलेले बांधकाम व अर्थ हे खाते राष्ट्रवादीने पळवून काँग्रेसवर कुरघोडीचे राजकारण केले.
जिल्हा परिषदेत गुरुवारी दिवसभर नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. उपाध्यक्षा आशा संजय दौंड यांच्याकडील अर्थ व बांधकाम हे वजनदार खाते काढल्याने त्या शेवटपर्यंत नाराज होत्या. उपाध्यक्षपदाचा राजीनामा फेकून त्यांनी नाराजी स्पष्टपणे दाखवून दिली. परंतु त्यांचा ‘नाराजी’नामा अमान्य करीत राकाँने त्यांची मनधरणी केली.
२१ सप्टेंबर रोजी जि.प.मध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष बैठक बोलावली होती. राष्ट्रवादीकडे २८ तर सेना, भाजपाकडे २९ इतकी सदस्य संख्या होती. राष्ट्रवादीच्या ताब्यातील सत्ता खेचून आणण्याची नामी संधी युतीला होती. मात्र काँग्रेसच्या आशा दौंड यांनी आघाडी धर्म पाळून राष्ट्रवादीच्या बाजुने उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोन्हीकडेही संख्याबळ २९-२९ असे समसमान झाले. शेवटी चिठ्ठ्या टाकून निवडी करण्यात आल्या. यात आघाडीने बाजी मारली होती. अध्यक्षपदी विजयसिंह पंडित तर उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या आशा दौंड यांची वर्णी लागली होती. त्यानंतर ३ आॅक्टोबर रोजी सभापती निवडीसाठी बैठक झाली.
अध्यक्ष, उपाध्यक्षपद गमावणाऱ्या युतीने ऐनवेळी माघार घेत मैदान सोडले होते. त्यामुळे चारही सभापतीपदे राष्ट्रवादीकडे गेली. समाजकल्याण सभापतीपदी महेंद्र गर्जे तर महिला व बालकल्याण सभापती म्हणून कमल मुंडे यांची निवड झाली. तत्कालीन सभापती संदीप क्षीरसागर तसेच बजरंग सोनवणे यांनाही सभापतीपदाची लॉटरी लागली होती. परंतु त्या दोघांच्या विषय समित्यांचे वाटप शिल्लक होते. शिक्षण सभापतीपदाची सूत्रे पुन्हा एकदा संदीप क्षीरसागर यांच्याकडे जातील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र झाले वेगळेच.
गुरुवारी सकाळी उपाध्यक्षा आशा दौंड यांनी पदभार स्वीकारला. अर्थ व बांधकाम या विषय समितीचा पदभार मागील अनेक वर्षांपासून उपाध्यक्षांकडेच होता. पदसिद्ध नसला तरी तो अलिखित नियमच बनला होता. आशा दौंड यांच्याकडेच हे खाते येईल, असे जवळपास निश्चित होते. परंतु ऐन वेळी त्यांचा पत्ता कट करण्यात आला.
तत्कालीन शिक्षण व आरोग्य सभापती संदीप क्षीरसागर यांचे नाव बैठकीत अर्थ व बांधकाम समितीसाठी पुढे आले.
त्यांच्याकडील शिक्षण व आरोग्य खात्याच्या सभापतीपदाची धुरा आ.धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक बजरंग सोनवणे यांच्याकडे सोपविण्यात आली. त्यामुळे सरते शेवटी उपाध्यक्षा दौंड यांना कृषी व पशुसंवर्धन हे दुय्यम मानले जाणारे खाते राहिले. याच खात्यावर त्यांची बोळवण करुन राष्ट्रवादीने त्यांचा अपेक्षाभंग केला.
दौंड यांचा ‘नाराजी’नामा नाकारला
अर्थ व बांधकाम खाते काढल्यामुळे उपाध्यक्षा आशा दौंड व त्यांचे पती संजय दौंड हे दोघेही नाराज झाले. राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा घेताना दिलेला शब्द न पाळल्यामुळे दौंड दाम्पत्य संतप्त झाले. विषय समित्यांच्या निवडी सुरू असताना त्या दोघांनीही सभागृहाच्या बाहेर थांबणे पसंत केले. विषय समित्यांच्या निवडीनंतर त्यांनी उपाध्यक्षपद सोडण्याचा टोकाचा निर्णयही घेतला.
एवढेच नाही तर त्यांनी राजीनामा तयार करुन अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्यासमोर ठेवला.
रंगले बैठकांचे सत्र
गुरुवारी सर्वसाधारण बैठकीच्या पूर्वी खाते वाटपासाठी पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र रंगले. राकाँचे नेते आ. जयदत्त क्षीरसागर तसेच जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या निवासस्थानी बंद दरवाजाआड बैठका झाल्या. या बैठकीतच दौंड यांना डावलण्याची खेळी ठरली होती. अर्थ व बांधकाम खाते काढून घेतल्याचे लक्षात आल्यावर दौंड दाम्पत्य बैठकीतून बाहेर पडले.
भाजपाचा बहिष्कार
राष्ट्रवादीच्या ताब्यात पुन्हा एकदा जिल्हा परिषदेची सत्ता गेल्यामुळे युतीच्या गोटात नाराजी आहे. गुरुवारी पहिल्यांदाच बोलावलेल्या सर्वसाधारण सभेच्या बैठकीवर भाजप पदाधिकाऱ्यांनी बहिष्कार टाकला. गटनेते मदनराव चव्हाण यांच्यासह युतीचा एकही सदस्य जि.प.कडे फिरकला नाही. बहुतांश जण मंत्रिमंडळ शपथविधीचा साक्षीदार होण्यासाठी मुंबई मुक्कामी होते.
म्हणे सारे शांततेत
अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी घडल्या प्रकारावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद नाहीत. बैठक शांततेत पार पडली. दौंड नाराज नाहीत, असे सांगून त्यांनी सावरासावर केली.
‘नो कॉमेंटस्’
उपाध्यक्षा आशा दौंड यांनी ‘नो कॉमेंटस्’ इतकीच प्रतिक्रिया नोंदवली. मात्र अर्थ व बांधकाम समिती काढून घेतल्यामुळे रंगलेले ‘नाराजी’नामा नाट्य आगामी काळात राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या तरी जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी सारवासारव केलेली असल्याने शांतता आहे. (प्रतिनिधी)