जिल्ह्यातील सहा पं़स़वर काँग्रेसचे वर्चस्व

By Admin | Updated: September 14, 2014 23:36 IST2014-09-14T23:26:30+5:302014-09-14T23:36:29+5:30

नांदेड : जिल्ह्यातील १६ पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती निवडीची प्रक्रिया रविवारी पार पडली़ यापैकी ६ पंचायत समित्या काँग्रेस, ६ राष्ट्रवादी काँग्रेस तर ४ पंचायत समित्यांवर शिवसेनेने ताबा मिळविला़

Congress dominates six paisas in the district | जिल्ह्यातील सहा पं़स़वर काँग्रेसचे वर्चस्व

जिल्ह्यातील सहा पं़स़वर काँग्रेसचे वर्चस्व

नांदेड : जिल्ह्यातील १६ पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती निवडीची प्रक्रिया रविवारी पार पडली़ यापैकी ६ पंचायत समित्या काँग्रेस, ६ राष्ट्रवादी काँग्रेस तर ४ पंचायत समित्यांवर शिवसेनेने ताबा मिळविला़ काही ठिकाणी सभापती निवड बिनविरोध झाली़
बिलोलीत राष्ट्रवादी-भाजपची युती
बिलोली : आठ सदस्यीय बिलोली पंचायत समितीच्या सभापतीपदी जि़प़ सदस्य मोहन पाटील टाकळीकर यांचे कट्टर समर्थक राकाँचे व्यंकट पाण्डवे यांची बिनविरोध निवड झाली़ दरम्यान, पंचायत समितीमध्ये पुन्हा राकाँ व भाजपाची युती झाली़ उपसभापती पदावर भाजपाचे शंकरराव परसुरे यांची वर्णी लागली़
पंचायत समितीमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही़ आगामी अडीच वर्षांकरिता सभापतीपद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे़ आठ सदस्यीय पंचायत समितीमध्ये दोन सदस्य दावेदार होते़ पण दोन्ही सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसकडेच आहेत़ त्यामुळे सभापतीपद राकाँकडेच जाणार हे पूर्वीच कळाले़ बिलोली पं़स़मध्ये निवडणुकीपूर्वीच राकाँ व भाजपामध्ये अलिखित युती होती़ राष्ट्रवादीचे मोहन पाटील टाकळीकर यांच्या रामतीर्थ गट व दोन्ही गणातून भाजपाने उमेदवारच उभे केले नाहीत़ माजी खा़भास्करराव पाटील खतगावकर यांचे बंधू रामतीर्थ गटातून होते़ टाकळीकर व ठक्करवाड यांनी सार्वत्रिक निवडणुकीतच अशी राजकीय खेळी खेळली व यशस्वी झाले़ परिणामी खतगावकरांना स्वत:च्या मतदारसंघातच पराभव स्वीकारावा लागला़ उर्वरित सहा गणांपैकी ४ गणांतून भाजपाचा विजय झाला़
निकालानंतर भाजपा ४, राकाँ २ व काँग्रेस २ असे चित्र पुढे आले़ पहिल्या अडीच वर्षात भाजपाला सभापतीपद तर उपसभापतीपद राकाँला मिळाले़ सध्या तालुक्यातील चित्र बदलले आहे़ तत्कालीन खासदार भाजपात गेल्याने दोन पं़स़ सदस्य देखील त्यांच्या पाठीशी आहेत़ त्यामुळे भाजपाचे संख्याबळ ६ असे झाले होते़ पण पक्षाकडे राखीव प्रवर्गातील उमेदवारच सदस्य नाही़
आज झालेल्या निवडणुकीत उपसभापती पाण्डवे यांची बढती होवून सभापती होण्याची संधी मिळाली़ रामतीर्थ गटातील अटकळी गणातून ते निवडून आलेले आहेत़ पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे बिलोली उपतालुकाप्रमुख होते़ टाकळीकर यांच्या विश्वासातले मानले जातात़ उपसभापतीपदी भाजपाचे शंकरराव परसुरे यांना संधी मिळाली़ जि़प़ सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड यांचे समर्थक असून बडूर गणातून निवडून आलेले आहेत़ निवडीनंतर दोघांचेही स्वागत करण्यात आले़ समर्थकांनी विजयी मिरवणूक काढली़
भोकर पं़स़वर काँग्रेसचा झेंडा
भोकर : येथील पंचायत समिती सभापती व उपसभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली असून सभापतीपदी कमलबाई जाधव तर उपसभापतीपदी मारोती झंपलवाड यांची निवड झाली़
भोकर पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण महिलासाठी राखीव होते़ या पदासाठी काँग्रेसकडून कमलबाई पांडुरंग जाधव तर शिवसेनेकडून रेणुकाबाई माधवराव आलेवाड यांचा अर्ज आला होता़ दुपारी २ वाजता झालेल्या मतदानात कमलबाई जाधव यांना ३ मते तर रेणुकाबाई आलेवाड यांना २ मते मिळाल्याने काँग्रेसच्या कमलबाई जाधव यांचा विजय झाला़ तर उपसभापती पदासाठी काँग्रेसकडून मारोती रुक्माजी झंपलवाड यांचा व शिवसेनेकडून रामा नारायण भालेराव यांचा अर्ज आला होता़ मारोती झंपलवाड यांना रामा भालेराव यांच्यापेक्षा एक मत जास्त पडल्याने त्यांची निवड झाली़ सदरील पं़स़त सहा सदस्य असून या निवडणूक प्रक्रियेत एक सदस्य गैरहजर होता़
यावेळी निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून तहसीलदार महेश परंडेकर, गटविकास अधिकारी जे़डी़ गोरे यांनी काम पाहिले़ सदरील निवड होताच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला़
अर्धापूर : सभापतीपदी जिजाबाई शिंदे
अर्धापूर : तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी जिजाबाई शंकरराव शिंदे यांची तर उपसभापतीपदी सुनील अटकोरे यांची बिनविरोध निवड झाली़
सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असलेल्या सभापतीपदी लहान पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या शेनी येथील जिजाबाई शिंदे यांची तर उपसभापतीपदी मालेगाव पंचायत समिती गणातून निवडून आलेले सुनील अटकोरे यांची बिनविरोध निवड झाली़ अटकोरे यांना उपसभापती पदाची दुसऱ्यांदा संधी मिळाली़ पं़स़च्या एकूण चार सदस्यांपैकी तीन सदस्य काँग्रेसचे तर एक सदस्य शिवसेना पक्षाचा असे बलाबल आहे़ त्यामुळे काँग्रेसच्या जिजाबाई शिंदे यांची सभापतीपदी निवड निश्चित होती़ यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार सतीश सोनी यांनी काम पाहिले तर गटविकास अधिकारी आऱपी़ भिसे, नायब तहसीलदार एस़एऩ देलमडे यांनी त्यांना सहाय्य केले़
नायगाव : सभापतीपदी मधुमती देशमुख
नायगाव बाजार : नायगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीच्या मधुमती देशमुख कुंटूरकर तर उपसभापतीपदी भाजपाचे माधव गजभारे यांची बिनविरोध निवड झाली़
येथील पं़स़ सभापतीपद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले होते़ या पदाची निवडणूक पं़स़ कार्यालयात घेण्यात आली़ सभापती पदासाठी राष्ट्रवादीच्या मधुमती राजेश देशमुख-कुंटूरकर तर उपसभापती पदासाठी भाजपाचे माधव माणिका गजभारे यांचाच उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली़ निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार व्यंकटेश मुढे यांनी काम पाहिले़
लोहा सभापतीपदी सोनाली ढगे
लोहा : येथील पंचायत समिती सभापतीपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होते़ आज झालेल्या निवडीत चिखलीकर समर्थक सोनाली ढगे यांची सभापतीपदी तर उपसभापतीपदी रोहित पाटील यांची सहा विरूद्ध पाच अशी निवड झाली़
पं़स़सभागृहात सभापती व उपसभापती निवडीच्या कार्यक्रमास दुपारी २ वाजता रितसर सुरुवात झाली़ उपविभागीय अधिकारी अश्विनी पाटील यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली सदरील निवड प्रक्रिया पार पडली़ सभापतीपदासाठी चिखलीकर गटाकडून सोनाली ढगे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून रेणुका फाजगे यांचे नामनिर्देशन पत्र पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार अशोक नांदलगावकर यांच्याकडे सादर करण्यात आले़ उपसभापतीपदासाठी चिखलीकर गटाकडून रोहित पाटील तर राष्ट्रवादीकडून माधव धांदणे निवडणूक रिंगणात होते़ हात उंचावून झालेल्या दोन्ही निवडीत सभापतीपदी सौ़ढगे तर उपसभापती रोहित पाटील यांची निवड करण्यात आली़
पक्षीय बलाबल पाहिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस ३, काँग्रेस ३, चिखलीकर समर्थक ६ असे आहे़ आजच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान काँग्रेसच्या वैशाली शेळके या अनुपस्थित राहिल्याने चिखलीकर गटाचा विजयाचा मार्ग सुकर झाला हे विशेष़ निवड प्रक्रियेसाठी नायब तहसीलदार आऱ जी़ तुपकर, निवडणूक विभागातील यु़डी़ मुकाडे, आऱआऱ सावते, अशोक मोकले, गोविंद हंबर्डे, स्वरूपा हंबर्डे आदींनी परिश्रम घेतले़
हदगाव : सभापतीपदी बालासाहेब कदम
हदगाव : पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती निवडणुकीची प्रक्रिया आज पं़स़ सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संतोष गोरड यांनी पार पाडली़ सभापतीपदी शिवसेनेचे बालासाहेब सोनबाराव कदम व उपसभापतीपदी जयश्री अशोकराव देशमुख यांची निवड झाली़
सभापतीपदासाठी मागील महिन्यात आरक्षणाची सोडत झाली़ त्यावेळी हदगाव पं़स़चे सभापतीपद खुल्या प्रवर्गासाठी सुटले़ तेव्हाच बालासाहेब कदम यांच्या नावावर माजी खा़ सुभाष वानखेडे, शिवसेना तालुकाप्रमुख नागेश पाटील आष्टीकर, बाबूराव कदम, पांडुरंग कोल्हे आदींच्या निर्णयातून शिक्कामोर्तब झाले होते़ हदगाव पंचायत समितीत शिवसेनेचे ७ सदस्य आणि काँग्रेसचे ५ सदस्य असे एकूण १२ सदस्य आहेत़ त्यामुळे सभापती शिवसेनेचा होणार यात काहीही दुमत नव्हते़ शिवसेनेचे खुल्या प्रवर्गातून निवघा गणातून निवडून आलेले बालासाहेब कदम यांना यावेळी संधी देण्याचे सर्वानुमते ठरले होते़
आज दुपारी नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या वेळेपर्यंत सभापतीपदासाठी शिवसेनेकडून बालासाहेब कदम व काँग्रेसकडून किशोर कदम रूईकर यांचे अर्ज आले़ तसेच उपसभापती पदासाठी शिवसेनेच्या जयश्री अशोकराव देशमुख व काँग्रेसच्या वतीने कौशल्या पुंडलिक राठोड यांचे अर्ज आले़ यावेळी शिवसेनेच्य सातही सदस्यांनी उपस्थिती दर्शवून सभापतीपदासाठी कदम यांना हात वर करून मते नोंदविली़ तर काँग्रेस उमेदवारास पाच मते पडली़ याचप्रमाणे उपसभापती पदासाठीही पाच विरूद्ध सात मते पडली़
किनवट : सभापतीपदी अश्विनी शेडमाके
किनवट : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बहुमत असलेल्या किनवट पंचायत समितीच्या झालेल्या सभापती व उपसभापतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आले़ सभापतीपद हे सर्वसाधारण वर्गाच्या महिलेकरिता आरक्षित होते़ कोठारी (सी़) गणातून निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अश्विनी भाऊराव शेडमाके यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाली़ तर उपसभापतीपदी चिखली गणातून निवडून आलेले किशोर चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली़ पिठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार शिवाजी राठोड यांनी काम पाहिले़ त्यांना गटविकास अधिकारी इंगोले यांनी सहकार्य केले़
नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांनी जि़ प़ उपाध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड यांच्या निवासस्थानी आ़ प्रदीप नाईक यांची भेट घेतली़ यावेळी आ़ नाईक यांनी सभापती व उपसभापती यांचे स्वागत केले़ यावेळी राकाँचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते़
मुखेड : सभापतीपदी गंगाबाई गायकवाड
मुखेड : मुखेड पंचायत समिती सभापतीपदी काँग्रेस पक्षाच्या गंगाबाई गायकवाड तर उपसभापतीपदी बालाजी पाटील आंबुलगेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली़
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या सभापती, उपसभापतीपदाच्या निवडणुकीत गटातटाच्या राजकारणातून काँग्रेस पक्षाकडे बहुमत असतानाही अपक्ष सदस्याच्या गळ्यात सभापतीची माळ टाकण्यासाठी राठोड व गोजेगावकर गटाने हालचाली चालवल्या होत्या़ मुखेड पंचायत समितीत १२ सदस्य असून काँग्रेस ९ व राठोड गटाचे ३ अपक्ष सदस्य आहेत़ अश्विनी गोजेगावकर यांचा अडीच वर्षाचा सभापतीपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढील अडीच वर्षांसाठी अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित झाले़ अनुसूचित जातीच्या गंंगाबाई गायकवाड रावी गणातून काँग्रेस पक्षाकडून निवडून आल्या असून केवळबाई कांबळे या सावरगाव (पी.) गणातून अपक्ष निवडून आल्या आहेत़ मुखेड काँग्रेसकडे आ़ बेटमोगरेकर गटाचे सहा सदस्य तर गोजेगावकर गटाचे तीन सदस्य आहेत़ गोजेगावकर गटाने आ़ बेटमोगरेकर यांना शह देण्यासाठी राठोड गटाच्या केवळाबाई कांबळे यांना सभापती करण्याच्या हालचाली चालवल्या होत्या़ मुखेड पं़स़ निवडणुकीत सभापती निवड टॉसवर होण्याचे संकेत होते़ पण काँग्रेस पक्षाकडून पक्षाचा व्हिप आल्याने सदस्य तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला़ गोजेगावकर गटाने उपसभापतीपद दिल्यास निवडणूक बिनविरोध करण्याची व आमदार गटाच्या सभापती करण्याची अट घातली़ काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील यांनी मध्यस्थी करून गोजेगावकर गटास उपसभापती देण्याचे मान्य करत मुखेड पंचायत समितीवर पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा मार्ग सुकर केला़
यावेळी पं़ स़ सदस्या स्वाती मुपडे यांनी सभापतीपदासाठी गंगाबाई गायकवाड यांचे नाव सूचविले़ तर अश्विनी पाटील गोजेगावकर यांनी बालाजी पाटील आंबुलगेकर यांचे नाव सूचविले़ सभापती व उपसभापती पदाचा एक एकच अर्ज आल्याने पिठासीन अधिकारी एस़पी़ घोळवे यांनी सभापती व उपसभापतीची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले़ यावेळी राठोड गटाचे अपक्ष सदस्य केवळबाई कांबळे, राजू घोडके, यशोदा शिंदे या सदस्या गैरहजर राहिल्या़ निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी गटविकास अधिकारी व्ही़बी़ कांबळे यांनी पोलिसांच्या मदतीने चोख बंदोबस्त ठेवला होता़
माहूर : सभापतीपदी चिंतामण राठोड
श्रीक्षेत्र माहूर : माहूर पंचायत समिती सभापतीपदी शिवसेनेचे चिंतामण राठोड तर उपसभापतीपदी जनाबाई कुडमते यांची बिनविरोध निवड करण्यात आली़
माहूर पंचायत समितीवर चार सदस्य असून शिवसेना २, काँग्रेस १ व राष्ट्रवादी १ असे पक्षीय बलाबल आहे़ अडीच वर्षाकरिता नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्गासाठी सभापतीपद राखीव आहे़ त्यासाठी शिवसेना २ व काँगे्रसचा १ अशी युती झाली़ तर राष्ट्रवादीस सूचक न मिळाल्याने ही निवडणूक बिनविरोध ठरली़ पिठासीन अधिकारी म्हणून डॉ़आशिष बिरादार व माहूर पंचायत समितीचे सचिव देशमुख यांनी काम पाहिले़ गत दहा वर्षांपासून माहूर पंचायत समितीवर शिवसेनेचे वर्चस्व कायम आहे़ ही परंपरा कायम ठेवण्यासाठी शिवसेना तालुकाप्रमुख जोतिबा खराटे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली़ नवनियुक्त सभापती चिंतामण राठोड हे सलाईगुडा येथील रहिवासी आहेत़ ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेस पक्षाने एक सदस्याचा बिनशर्त पाठिंबा दिला होता़ या मोर्चेबांधणीत संजय राठोड, अनंतराव केशवे, किशन राठोड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली़
धर्माबाद : सभापतीपदी रामकिशन एंगलोड
धर्माबाद : राष्ट्रवादीच्या पं़स़सदस्या मुक्ता रामपुरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने पुन्हा पंचायत समिती काँग्रेसकडे गेली़ म्हणून पंचायत समिती सभापतीपदी रामकिशन एंगलोड तर उपसभापतीपदी मुक्ता रामपुरे यांची बिनविरोध निवड झाली़ पिठासीन अधिकारी तथा तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी ही निवड घोषित केली़
धर्माबाद पं़स़त चार सदस्य असून दोन राष्ट्रवादीचे, दोन काँग्रेसचे असे पक्षीय बलाबल होते़ अडीच वर्षांच्या कालावधीनंतर २०१४ मध्ये पंचायत समितीचे सभापतीपद अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने काँग्रेसचे पं़स़ उपसभापती रामकिशन एंगलोड हे एकमेव असल्याने त्यांची निवड निश्चित होती़ पण उपसभापती पद कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे लक्ष लागून होते़ राष्ट्रवादीच्या पं़स़ सदस्या मुक्ता रामपुरे यांनी राष्ट्रवादीला कंटाळून अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला़ आणि काँग्रेसचे तीन, राष्ट्रवादीचा एक असे पक्षीय बलाबल निर्माण झाले़ यावेळी आ़ वसंतराव चव्हाण, पं़स़ माजी सभापती सावित्राबाई रंगे, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस वर्णी नागभूषण, कृउबा सभापती गणेशराव पाटील करखेलीकर, नरेंद्र रेड्डी, श्रीराम पाटील जगदंबे, गोविंद पा़ सोनटक्के, गणेशराव पा़ बाचेगावकर, संजय पा़ शेळगावकर उपस्थित होते़ पिठासीन अधिकारी राजाभाऊ कदम, सहाय्यक निवडणूक अधिकारी नायब तहसीलदार श्रीकांत भुजबळे, गटविकास अधिकारी व्ही़आऱ कोंडेकर यांनी काम पाहिले़
हिमायतनगर : सभापती आडेलाबाई हातमोड
हिमायतनगर : हिमायतनगर पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या आडेलाबाई हातमोड तर उपसभापती पदी काँग्रेसच्या लक्ष्मीबाई भवरे यांची वर्णी लागली आहे़ ही निवडणूक बिनविरोध पार पडली़
हिमायतनगर पंचायत समितीत एकूण सहा सदस्य आहेत़ यातील चार सदस्य काँग्रेस, एक शिवसेना व एक अपक्ष असे पक्षीय बलाबल आहे़ येथील सभापतीपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव झाले़
आडेलाबाई हातमोड या एकमेव महिला सदस्य एसटी प्रवर्गातून होत्या़ त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली़ पिठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार शरद झाडगे व गटविकास अधिकारी विलास गंगावणे यांनी काम पाहिले़ निवडणूक प्रक्रियेसाठी नायब तहसीलदार डी़एऩ गायकवाड यांनी सहकार्य केले़
मुदखेड : सभापतीपदी सखुबाई गोणेवाड
मुदखेड : पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या सखुबाई लोकडू गोणेवाड तर उपसभापतीपदी सुनील सुधाकरराव देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली़ दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाला होता़ त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याचे संकेत यापूर्वीच प्राप्त झाले़
पिठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार एल़ डी़ सोनवणे यांनी काम पाहिले़ या पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे तीन सदस्य असून शिवसेनेच्या एकमेव महिला सदस्य अर्चनाताई ढगे या आहेत़ या निवडीच्या वेळी त्या उपस्थित नव्हत्या़
नूतन सभापती, उपसभापतींचा सत्कार करण्यात आला़ यावेळी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, चेअरमन व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते़ कार्यकर्त्यांनी जल्लोष करुन सभापती, उपसभापतींचे स्वागत केले़ (ठिकठिकाणच्या वार्ताहरांकडून)
सभापतीपदी बहिरवाड
उमरी: पंचायत समितीच्या सभापतीपदी सिंधी गणाच्या राष्ट्रवादी काँगे्रसच्या सदस्या अंजनाबाई संजय बहिरवाड तर उपसभापतीपदी पल्लवी शिरीषराव देशमुख- गोरठेकर यांची बिनविरोध निवड झाली़ पिठासीन अधिकारी तथा तहसीलदार टी़वाय़ जाधव यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली़ यावेळी निवड प्रक्रियेत वरील दोनच अर्ज आले़ म्हणून सदरची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा जाधव यांनी केली़ उमरी पं़स़मध्ये एकूण चारही सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे असून माजी आ़ बापसाहेब देशमुख गोरठेकर गटाचे निर्विवाद वर्चस्व आहे़ सदर निवडीच्या वेळी मावळते सभापती शिवाजीराव देशमुख, पं़स़ सदस्य कृष्णाजी बोईवार यांची उपस्थिती होती़ नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींचे यावेळी स्वागत करण्यात आले़
कंधार : सभापतीपदी बालाजी पांडागळे
कंधार पं़स़ सभापती-उपसभापती पदासाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे बालाजी पांडागळे यांची सभापती म्हणून तर उपसभापतीपदावर शेकापच्या सुनीता कांबळे यांची निवड झाली़ लोकमतने व्यक्त केलेला अंदाज (शेकापचा सत्तापदाचा दावा) अखेर खरा ठरला़ यापूर्वीही पांडागळे यांचा दावा सुद्धा खरा ठरला़ कंधार पं़स़ निवडणूक चुरशीची झाली होती़ कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नव्हते़ चिखलीकर समर्थक ५, काँग्रेस ३, शेकाप २ व राष्ट्रवादी काँगे्रस २ असे पक्षीय बलाबल आहे़ यापूर्वी शेकापने पाठिंबा दिल्याने काँग्रेसचा सभापती व उपसभापतीपद राकाँकडे देण्यात आले़ यावेळी शेकापने सत्तेचा दावा केल्याने राकाँला नमते घ्यावे लागले़ सभापतीपदासाठी काँग्रेसचे बालाजी पांडागळे व चिखलीकर गटाकडून ललिताबाई चिखलीकर यांनी उमेदवारी दाखल केली़ उपसभापतीपदासाठी सुनीता कांबळे व कौशल्या केंद्रे यांनी उमेदवारी दाखल केली होती़ परंतु चिखलीकर समर्थक सदस्यांनी मतदानाकडे पाठ फिरविली़ त्यामुळे पांडागळे यांची सभापती म्हणून तर उपसभापती म्हणून सुनीता कांबळे यांची निवड घोषित करण्यात आली़ पिठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार शिंदे, गटविकास अधिकारी तथा पं़स़ पदसिद्ध सचिव अनंत कदम, नायब तहसीलदार सुरेश वडवळकर, नायब तहसीलदार उत्तम निलावाड, मिनी बीडीओ प्रदीप सोनटक्के आदींनी काम पाहिले़
नांदेड पंचायत
समिती काँग्रेसकडे
नांदेड : नांदेड पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे चंदर बुक्तरे यांची तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे गोपाळराव कदम यांची बिनविरोध निवड झाली़ रविवारी झालेल्या निवड प्रक्रियेत अध्यक्षपदासाठी बुक्तरे, उपसभापती पदासाठी कदम यांचा प्रत्येकी एक अर्ज आला़ ८ सदस्य असलेल्या नांदेड ्रपं़स़मध्ये काँग्रेसचे ४, सेनेचे ३ आणि राष्ट्रवादी १ असे बलाबल आहे़
देगलूर : सभापतीपदी अक्केमोड
देगलूर: पंचायत समितीच्या सभापतीपदावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेखा अक्केमोड यांची तर उपासभापतीपदी व्यंकटराव पा़ मरतोळीकर यांची बिनविरोध निवड झाली़ मावळत्या सभापती पार्वती सूर्यवंशी यांचे शिवसेनेतून पक्षांतर आणि शिवसेनेत झालेला बेबनाव या कारणाने शिवसेनेला उपसभापतीपद सुद्धा मिळू शकले नाही़ या दोन्ही पदांच्या निवड प्रक्रियेसाठी तहसीलदार जीवराज डापकर यांची नियुक्ती करण्यात आली होती़ दुपारी १२ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या मुदतीत सभापतीपदासाठी सुरेखा अक्केमोड (तडखेल गण), उपसभापती पदासाठी व्यंकटराव पाटील मरतोळीकर (मानूर गण) यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची त्या त्या पदासाठी निवड झाल्याचे पं़स़ सदस्यांच्या विशेष सभेत घोषित करण्यात आले़ विशेष सभेस काँगे्रस पक्षाचे तीनही सदस्य गैरहजर राहिले़ देगलूर पंचायत समितीच्या दहा जागांपैकी राष्ट्रवादी ४, शिवसेना ३, काँग्रेस ३ असे पक्षीय बलाबल असून उर्वरित अडीच वर्षांचे सभापतीपद नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) साठी आरक्षित आहे़

Web Title: Congress dominates six paisas in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.