काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त

By Admin | Updated: May 17, 2014 00:21 IST2014-05-16T22:54:38+5:302014-05-17T00:21:28+5:30

लातूर : लातूर लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच भारतीय जनता पार्टीच्या कार्र्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाके फोडून जल्लोष केला.

Congress destroyed the bastion | काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त

काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त

लातूर : लातूर लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच भारतीय जनता पार्टीच्या कार्र्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाके फोडून जल्लोष केला. अब की बार... मोदी सरकारच्या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला होता. बार्शी रोडवरील महिला तंत्रनिकेतनच्या परिसरात भाजपा कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी डॉ. सुनील गायकवाड यांच्या विजयाची घोषणा करताच भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. बार्शी रोडवरील महिला तंत्रनिकेतनच्या सभागृहात शुक्रवारी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ झाला होता. पहिल्या फेरीपासून भाजपच्या डॉ. सुनील गायकवाड यांनी आघाडी घेतली होती. प्रत्येक फेरीचा निकाल बाहेर येताच फटाक्यांची आतषबाजी कार्यकर्ते करीत होते. मतमोजणीच्या एकूण २५ फेर्‍या झाल्या. प्रत्येक फेरीत डॉ. सुनील गायकवाड यांना आघाडी मिळत असल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत होता. २५ व्या फेरीअखेर डॉ. गायकवाड यांना ६ लाख १६ हजार ५०९ मते मिळाली. २ लाख ५३ हजार ३९५ मतांची आघाडी मिळाल्याने कार्यकर्त्यांच्या जल्लोषात वाढ झाली. जसजसे मताधिक्य वाढत गेले तसतसे कार्यकर्त्यांचा माहोल वाढत गेला. सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास पूर्ण निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवार डॉ. सुनील गायकवाड यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. माजी खा. रुपाताई पाटील, माजी आ.संभाजी पाटील, रमेश कराड, माजी आ. गोविंद केंद्रे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नागनाथअण्णा निडवदे, रिपाइंचे चंद्रकांत चिकटे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी या विजयी मिरवणुकीत सहभाग नोंदविला. विजयाची खूण दाखवून जनतेला अभिवादन करीत मिरवणूक प्रकाश नगरातील सुनील गायकवाड यांच्या घरापर्यंत पोहोचली. यावेळी शहरातील तसेच बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांनीही त्यांचे जल्लोषात स्वागत केले. रस्त्यांवर ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी तसेच पुष्प वर्षाव करून त्यांचे स्वागत करण्यात येत होते. इकडे गांधी चौकातील पक्ष कार्यालयासमोर फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. भाजप, शिवसेना व रिपाइं कार्यकर्त्यांनीही या आनंदोत्सवात सहभाग नोंदवून उत्साह आणखी द्विगुणित केला. मोदींनी लातुरात घेतलेली सभा फलदायी ठरली़ भाजप उमेदवारास पूर्ण मतदारसंघात पोहोचता आले नसतानाही मिळालेला विजय मोदी लाटेचा परिपाक दिसतो़ उमेदवारीवरुन भाजपात मतभेद झाले असले तरी मोदी लाटेमुळे जनतेच्या हातात निवडणूक आली़ नरेंद्र मोदी यांच्या जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या सभेची पडलेली छाप मतदान होईपर्यंत कायम राहिली़ मतदारांच्या ‘माऊथ कॅम्पेनिंग’चाही प्रभाव पडला़ डॉ़सुनील गायकवाड यांच्या उमेदवारीपासून विजयापर्यंत सिंहाचा वाटा उचलला तो माजी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी़ कार्यकर्त्यांचे अथवा संस्थात्मक जाळे नसलेल्या सुनिल गायकवाडांची प्रचार यंत्रणा त्यांनी एकहाती फिरविली़ कोणत्याही स्थानिक मुद्याला स्पर्श न करता भाजपा नेत्यांनी मोदी यांची लोकप्रियता ‘कॅश’ करण्याला प्राधान्य दिले़ वरचेवर मोदी प्रतिमा मतदारांना भावत गेली़ हा मोदी प्रचार सुनील गायकवाड यांच्या विजयाला, मताधिक्याला कारणीभूत ठरला़

Web Title: Congress destroyed the bastion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.