काँग्रेसच लातूरचा विकास करू शकते
By Admin | Updated: October 12, 2014 00:45 IST2014-10-12T00:45:11+5:302014-10-12T00:45:11+5:30
लातूर : विलासराव देशमुख आणि माझे वडील माधवराव शिंदे हे लोकनायक नेते होते. माझे भाऊ अमित देशमुखच विलासरावांनी केला तसा लातूरचा विकास करु शकतात.

काँग्रेसच लातूरचा विकास करू शकते
लातूर : विलासराव देशमुख आणि माझे वडील माधवराव शिंदे हे लोकनायक नेते होते. माझे भाऊ अमित देशमुखच विलासरावांनी केला तसा लातूरचा विकास करु शकतात. मंत्रीपदाच्या शंभर दिवसात दीड हजार कोटीची विकासकामे खेचून आणणाऱ्या अमित देशमुखांच्या पाठीमागे लातूरकरांनी खंबीरपणे उभे राहून त्यांना निवडून द्यावे, असे आवाहन काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी शनिवारी दुपारी हनुमान चौकात झालेल्या सभेत केले.
यावेळी मंचावर माजी राज्यमंत्री अमित देशमुख, माजी मंत्री आ. दिलीपराव देशमुख, आ. बसवराज पाटील, महापौर स्मिता खानापुरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अलि अजिजी, आ. वैजनाथ शिंदे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष एस. आर. देशमुख, प्रा. बी. व्ही. मोतीपवळे, धीरज देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. व्यंकट बेद्रे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
लातूरकरांचे शनिवारी ज्योतिरादित्य हे खास आकर्षण ठरले. भरगच्च लातुरकरांच्या उपस्थितीत त्यांनी लातुरकरांना जिंकून घेतले. अमित देशमुख आणि ज्योतिरादित्य शिंदे ही जोडगोळी मंचावर येताच टाळ्यांच्या कडकडाटाने त्यांचे जंगी स्वागत झाले.
आपल्या अस्खलित मराठीतून बोलताना ज्योतिरादित्य शिंदे यांनी लातूरकरांना जिंकले. पुढे बोलताना अमित देशमुखांच्या नेतृत्वाचे कौतुकही केले.
लातूरचा हा सुपूत्र आपल्या वडीलांप्रमाणेच राज्यात नाव करणार असल्याचे सांगून शंभर दिवसाच्या मंत्रीपदाच्या काळात दीड हजार कोटीची विकास कामे हा विक्रम केला आहे. विलासराव देशमुखांसारखे लोकनेते या लातूरने देशाला दिले होते. माझ्या वडीलांशी विलासरावांचे खुप चांगले संबंध होते. ते दोघे जवळचे मित्र होते. त्यांच्या सारखा विकासपुरुष होणे नाही. जसे लातूरकर विलासरावांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहीले, तसेच अमित देशमुखांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार यात शंका नाही. कारण विलासरावांचा वारसा अमित देशमुख मोठ्या खुबीने चालवित आहेत. देशमुख परिवाराने लातूरच्या विकासासाठी स्वत:ला वाहून घेतले आहे. भाजपा हा जातीयवादाचे विष पेरणारा पक्ष आहे. सत्तेत आल्यावर लोक कसे बदलतात याचे उदाहरण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे. चीन, पाकिस्तानला धडा शिकवू म्हणणारे मोदी चीनच्या राष्ट्रपतींबरोबर झुल्यावर बसून वार्तालाप करीत होते. तेव्हा चीन देशावर कुरघोड्या करीत होता. कुठे गेली ती मोदींची प्रचारातील भाषा ? असा सवालही त्यांनी केला. आपल्या ओघवत्या भाषणात ज्योतिरादित्य यांनी लातूरकरांना जिंकून घेतले. यावेळी अली अजिजी म्हणाले, काँग्रेसने सर्व समाजाच्या विकासासाठी भरभरून प्रयत्न केले आहेत. अजूनही पक्षाचे धोरण सर्वसामान्यांचा विकास हेच आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला मतदान करावे, असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी व्यंकट बेद्रे यांनी प्रास्ताविक केले तर काँग्रेस शहराध्यक्ष मोईज शेख यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)