काँग्रेस- भाजपा एकत्रित येणार ?
By Admin | Updated: March 4, 2017 00:30 IST2017-03-04T00:28:10+5:302017-03-04T00:30:51+5:30
उमरगा : पंचायत समिती निवडणुकीत १८ पैकी ९ जागा काँग्रेसने पटकाविल्या असून, बहुमतासाठी एका उमेदवाराची आवश्यकता आहे़

काँग्रेस- भाजपा एकत्रित येणार ?
उमरगा : पंचायत समिती निवडणुकीत १८ पैकी ९ जागा काँग्रेसने पटकाविल्या असून, बहुमतासाठी एका उमेदवाराची आवश्यकता आहे़ भाजपाने ३, सेनेने दोन तर राष्ट्रवादीने चार जागांवर विजय मिळविला असून, काँग्रेस सत्तास्थापनेसाठी भाजपाला सोबत घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे़ काँग्रेसकडे सभापतीपद तर भाजपाला उपसभापतीपद देण्याबाबत खलबते सुरू असल्याचेही बोलले जात असून, उपसभापतीपदासाठी भाजपाकडून युवराज जाधव यांच्या नावाची चर्चा रंगली आहे़
उमरगा पंचायत समितीवर मागील १५ वर्षापासून काँग्रेसची निर्विवाद सत्ता आहे़ यंदा झालेल्या चौरंगी लढतीत काँग्रेसने १८ पैकी नऊ जागांवर विजय मिळविला आहे़ जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेस विरूध्द राष्ट्रवादी काँग्रेस असे चित्र आजवर असल्याने काँग्रेसने भाजपा, सेनेसोबत राजकीय करार करून ठिकठिकाणी सत्ता मिळविली आहे़ तालुक्यात मात्र, सेना आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये हाडवैर आहे़ ही बाब पाहता बहुमतासाठी काँग्रेस भाजपासोबत जाण्याची चिन्हे आहेत़ मागील उमरगा बाजार समिती व नगर पालिका निवडणुकीत काँग्रेसची भाजपासोबत झालेली आघाडी पंचायत समितीतही कायम राहण्याची शक्यता आहे़
दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या सत्तेतील राजकीय गणितात काँग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे़ जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवरूनही मोठ्या राजकीय हालचाली सुरू आहेत़ तत्पूर्वी पंचायत समितीचे सभापती, उपसभापती निवडले जाणार आहेत़ असे असले तरी जिल्हा परिषदेबाबत होणाऱ्या राजकीय हलचालींवर तालुक्यातील सत्तास्थापनेचे चित्र राहणार आहे़ पंचायत समिती निवडणुकीत भाजपाला मिळालेले यश सत्तेतील उपसभापतीपद मिळविण्यास यशस्वी ठरणार का ? याकडे लक्ष लागले आहे़ सभापतीपद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने काँग्रेसकडून विद्यमान उपसभापती मदन पाटील, आ़ बसवराज पाटील यांचे चुलत बंधू अॅड़ राजासाहेब पाटील यांची नावे चर्चेत आहेत़
मदन पाटील यांनी उपसभापती असताना केलेली कामे पाहता त्यांना पक्ष प्राधान्य देण्याची चर्चा आहे़ असे असले तरी नगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये आलेले अॅड़ राजासाहेब पाटील यांच्या नावाचीही चर्चा आहे़ आमदार बसवराज पाटील कोणाला सभापतीपदाची संधी देणार ? याकडे तालुक्याचे लक्ष वेधले आहे़ (वार्ताहर)