काँग्रेस,सेना,मनसे उमेदवारांचे अर्ज
By Admin | Updated: September 26, 2014 00:43 IST2014-09-26T00:41:34+5:302014-09-26T00:43:33+5:30
नांदेड : विधानसभा निवडणुकीत घटस्थापनेच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील प्रमुख उमेदवारांनी गुरूवारी शक्तीप्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले़

काँग्रेस,सेना,मनसे उमेदवारांचे अर्ज
नांदेड : विधानसभा निवडणुकीत घटस्थापनेच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील प्रमुख उमेदवारांनी गुरूवारी शक्तीप्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले़ यात काँग्रेसच्या विद्यमान चार आमदारांसह सर्वच पक्षांच्या नेत्यांचा समावेश होता़
विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्यास २० सप्टेंबरपासून प्रारंभ झाला असला तरी प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी पितृपक्ष पंधरवाड्यात उमेदवारी दाखल करण्यास पसंती दर्शविली नाही़ आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील एकुण नऊ विधानसभा मतदारसंघातून गुरुवारी ६६ इच्छुकांनी ९१ नामनिर्देशनपत्रे दाखल केली़
किनवट मतदारसंघ-६, हदगाव-३, भोकर-४, नांदेड उत्तर-१५, नांदेड दक्षिण-१६, लोहा-४, नायगाव-४, देगलूर-९, मुखेड-५ एकुण ९१ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले़ गुरुवारी प्रामुख्याने काँग्रेस पक्षाकडून पालकमंत्री डी़ पी़ सावंत, आ़ ओमप्रकाश पोकर्णा, आ़ माधवराव पाटील जवळगावकर, आ़ हणमंत पाटील बेटमोगरेकर, शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख हेमंत पाटील, माजी आ़ प्रताप पाटील चिखलीकर, मनसेकडून अॅड़ दिलीप ठाकूर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापुसाहेब गोरठेकर यांचा समावेश होता़
काँग्रेसचे नांदेड उत्तरचे उमेदवार आ़ सावंत यांची वर्कशॉपपासून तर नांदेड दक्षिणचे उमेदवार आ़ पोकर्णा यांनी चौफाळा येथून रॅली निघाली़ माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या उपस्थितीत उमेदवारी दाखल केली़ सेनेचे हेमंत पाटील यांनीही जुन्या नांदेडातून रॅली काढून उमेदवारी दाखल केली़ मनसेचे अॅड़ दिलीप ठाकूर यांनी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली़ त्यांनी तरोडा नाका येथून रॅली काढली़
दरम्यान, शुक्रवारी बसपाचे सुरेश गायकवाड हे नांदेड उत्तर मतदारसंघातून तर मनसेचे प्रकाश मारावार हे नांदेड दक्षिण मतदारसंघातून तसेच मनोहर धोंडे हे लोह्यात अर्ज दाखल करतील़
उमेदवारी दाखल करण्यासाठी २७ सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे़ शेवटच्या दोन दिवसांत उमेदवारी दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी होणार आहे़ (प्रतिनिधी)