पुन्हा काँग्रेस, शिवसेनेत टस्सल !

By Admin | Updated: June 14, 2014 01:20 IST2014-06-14T01:17:01+5:302014-06-14T01:20:23+5:30

रमेश शिंदे, औसा काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या औसा विधानसभा मतदारसंघावर १९९९ आणि २००४ मध्ये शिवसेनेने भगवा फडकाविला होता.

Congress again, Shiv Sena tasal! | पुन्हा काँग्रेस, शिवसेनेत टस्सल !

पुन्हा काँग्रेस, शिवसेनेत टस्सल !

रमेश शिंदे, औसा
काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या औसा विधानसभा मतदारसंघावर १९९९ आणि २००४ मध्ये शिवसेनेने भगवा फडकाविला होता. तर २००९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार दिनकर माने यांच्यावर १४ हजार ९७५ मतांनी काँग्रेस उमेदवार बसवराज पाटील यांनी मात केली. आता होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही काँग्रेस, शिवसेनेतच लढत होण्याची शक्यता असून, मनसेकडूनही तयारी सुरू आहे. राष्ट्रवादीच्या भूमिकेला महत्त्व येणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर विधानसभा निवडणुकीचे वेध सर्वच राजकीय पक्षांतील इच्छुकांना लागले आहेत. त्यानुसार मोर्चेबांधणीही सुरू झाली आहे. औसा तालुक्यातील १०३ आणि निलंग्यातील ६३ गावे मिळून हा मतदारसंघ आहे. आपसूकच औशाचा आमदार ठरविताना निलंगा तालुक्यालाही महत्त्व आले आहे.
गेल्या ५ वर्षांत मोठ्या प्रमाणात निधी खेचून औसा विधानसभा मतदारसंघाला विकासाच्या रुळावर आणल्याचा दावा काँग्रेस करीत आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीतही पुन्हा काँग्रेस विजयी होईल, अशी खात्री त्यांना आहे. त्यामुळेच विद्यमान आमदार बसवराज पाटील उमेदवारीचे दावेदार आहेत. तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत औसा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार रवि गायकवाड यांना ५४ हजारांची आघाडी मिळाली आहे. विधानसभेतही अशीच आघाडी मिळेल, अशी खात्री शिवसेनेला आहे. तथापि, शिवसेनेकडून माजी आमदार दिनकर माने यांचा प्रबळ दावा आहे. तर दिनकर माने यांचे समर्थक आणि मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे संचालक बालाजी गिरे मनसेचा झेंडा खांद्यावर घेऊन विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. असे अनेक इच्छुक कामाला लागले आहेत.
गेल्या विधानसभा निवडणुकीसाठी साई शुगरचे चेअरमन राजेश्वरराव बुके यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली होती. आताही त्यांनी मतदारसंघात चाचपणी सुरू केली असून, ते काँग्रेसकडून लढण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत भरघोस मतांची आघाडी मिळाल्यामुळे शिवसेनेत चैतन्य असून, विधानसभा निवडणुकीतही त्यांना चमत्काराची अपेक्षा आहे. तर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या काही लोकांनी डॉ. पद्मसिंह पाटील यांना मदत केली नसल्याचा आरोप करणाऱ्या राष्ट्रवादीच्या भूमिकेला महत्त्व येणार आहे.
एकूणच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, शिवसेनेत लढत होण्याची शक्यता असून, मनसेही या निवडणुकीत रंगत आणणार आहे.
काँग्रेसबसवराज पाटील मुरुमकर ८४५२६
शिवसेनादिनकर माने ६९७७१
अपक्षअ‍ॅड. श्रीकांत सूर्यवंशी ३३०८
इच्छुकांचे नाव पक्ष
बसवराज पाटील मुरुमकर काँग्रेस
राजेश्वरराव बुके काँग्रेस
दिनकर माने शिवसेना
बालाजी गिरे मनसे
लोकसभा निवडणुकीत रवि गायकवाड यांना ५४ हजार मताधिक्य

Web Title: Congress again, Shiv Sena tasal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.