स्थानकात गोंधळ
By Admin | Updated: April 27, 2015 00:58 IST2015-04-27T00:53:10+5:302015-04-27T00:58:30+5:30
उस्मानाबाद : येथील बसस्थानकात दारूच्या नशेत तर्र असलेल्या एका बसचालकाने रविवारी दुपारी मोठा गोंधळ घातला़ स्थानक प्रमुखांसह इतर अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांशी

स्थानकात गोंधळ
उस्मानाबाद : येथील बसस्थानकात दारूच्या नशेत तर्र असलेल्या एका बसचालकाने रविवारी दुपारी मोठा गोंधळ घातला़ स्थानक प्रमुखांसह इतर अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांशी अरेरावी करीत टेबलावरील काचा फोडण्यासह पोलीस कर्मचाऱ्यांशीही अरेरावी केली़ या प्रकरणी स्थानकप्रमुखांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद आगारातील चालक शिवाजी कुंडलीक तेरकर यांची सायंकाळी सहा वाजता भिवंडी बसवर होती़ मात्र, दुपारी एक वाजल्यापासूनच तेरकर यांनी मद्यप्राषण करून वाहक- चालकांना शिवीगाळ करण्यासह अधिकाऱ्यांनाही अरेरावी करीत होता़ दुपारी २ वाजण्याच्या सुमारास स्थानकप्रमुख हर्षद बनसोडे हे कार्यालयाबाहेर आले असता सुपरवायजर टेकाळे, कोळी यांच्याशी तेरकर हे शाब्दीक बाचाबाची करीत असल्याचे दिसून आले़ त्यावेळी बनसोडे यांनी चालक तेरकरची समजूत काढून त्याला तेथून जाण्यास सांगितले़ मात्र, तेरकर यांनी गोंधळ सुरूच ठेवला होता़ त्यावेळी बनसोडे यांनी बसस्थानकात कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला बोलावून चालकाला बाहेर नेण्याबाबत सांगितले़ त्यावेळी तेरकर यांना उठविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यालाही अरेरावी केली़ त्यानंतर स्थानकप्रमुख हर्षद बनसोडे यांच्या कार्यालयातील टेबल उचलून आदळला़ तसेच टेबलावरील काचा फोडून, कागदपत्रे, फाईल्स विस्कटून टाकल्या़ स्थानकात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने शहर पोलिसांना माहिती देवून कर्मचारी बोलावून घेतले़ त्यावेळी आलेल्या कर्मचाऱ्यांनाही तेरकर अरेरावी करीत असल्याचे स्थानकप्रमुख बनसोडे यांनी सांगितले़ त्यानंतर तेरकर याला शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे़ या प्रकरणी पोलीस कर्मचारी बिभिषण देडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बसचालकाविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास फौजदार जमादार हे करीत आहेत़ (प्रतिनिधी)