‘गोंधळ मांडिला, आई गोंधळाला यावं’
By Admin | Updated: September 29, 2014 00:41 IST2014-09-29T00:41:14+5:302014-09-29T00:41:14+5:30
औरंगाबाद : स्थळ- सिडको एन-९ परिसरातील प्रती माहूर म्हणून ओळखले जाणारे रेणुकामाता मंदिर. वेळ- सायंकाळी ७.३० वाजेची. आरतीसाठी शेकडो भाविक शिस्तीने येथे बसले होते.

‘गोंधळ मांडिला, आई गोंधळाला यावं’
औरंगाबाद : स्थळ- सिडको एन-९ परिसरातील प्रती माहूर म्हणून ओळखले जाणारे रेणुकामाता मंदिर. वेळ- सायंकाळी ७.३० वाजेची. आरतीसाठी शेकडो भाविक शिस्तीने येथे बसले होते. आरती झाली आणि नागरिकांमधून तुणतुणे, संबळ वाजवत चार जण समोर आले.
‘तुळजापूरची भवानी आई, गोंधळाला यावं, कोल्हापूरची अंबाबार्ई, गोंधळाला यावं, गोंधळ मांडिला, आई गोंधळाला यावं...’
असे गात कुलस्वामिनी, ग्रामदेवी, आराध्यदैवत, अशा सर्व दैवतांना गोंधळाला येण्याचे आवाहन केले जाऊ लागले.... आणि हे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली.
गोंधळाचा कार्यक्रम रंगत होता, तसतसा भाविकांचा उत्साह वाढत होता... असे दृश्य सध्या नवरात्रोत्सवात पाहावयास मिळत आहे. रेणुकामाता मंदिरात नवरात्रोत्सवात सायंकाळी देवीची आरती व त्यानंतर धार्मिक कार्यक्रम पाहणे म्हणजे एक सुवर्णयोगच होय. डोळ्याचे पारणे फेडणारा हा धार्मिक सोहळा पाहण्यासाठी आता सिडको- हडकोच नव्हे तर जुन्या शहरातून तसेच आसपासच्या पंचक्रोशीतूनही भाविक मोठ्या संख्येने येत असतात. मागील २७ वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे.
सायंकाळी शहरातील मान्यवरांच्या हस्ते देवीची आरती केली जाते. ही आरती रेणुकामाता भजनी मंडळ तालासुरात सादर करते. सामूहिकरीत्या आरती गाताना भाविकही हरखून जातात. सुमारे एक ते सव्वातास विविध आरत्या गाण्यात येतात. यानंतर देवीची पदे गायली जातात व गोंधळ सादर करण्यासाठी दिलीप पाटील व दादा राजहंस सज्ज होतात.
अंगात झबला, कपाळावर कुंकू, गळ्यात कवड्यांची माळ, अशा वेशभूषेतील हे गोंधळी सर्वप्रथम विविध देवी-देवतांना आमंत्रण देतात. त्यानंतर देवीचा जोगवा मागितला जातो. ‘अनादी निर्गुण प्रगटली भवानी... आईचा जोगवा जोगवा मागीन...’ आदी गोंधळ गायला जातो. हा धार्मिक कार्यक्रम पाहण्यासाठी शेकडो भाविक मंदिर परिसरात तासन्तास उभे असतात.