लसीसाठी आरोग्य केंद्रांवर गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:06 IST2021-07-07T04:06:24+5:302021-07-07T04:06:24+5:30
औरंगाबाद : शासनाने सोमवारी रात्री औरंगाबाद जिल्ह्याला केवळ २६ हजार लस दिल्या. महापालिकेच्या वाट्याला १० हजारच आल्या. मंगळवारी सकाळी ...

लसीसाठी आरोग्य केंद्रांवर गोंधळ
औरंगाबाद : शासनाने सोमवारी रात्री औरंगाबाद जिल्ह्याला केवळ २६ हजार लस दिल्या. महापालिकेच्या वाट्याला १० हजारच आल्या. मंगळवारी सकाळी शहरातील ३९ केंद्रांवर लसीकरणाला सुरुवात झाली. प्रत्येक केंद्रावर १५० डोस देण्यात आले. त्यात दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी १००, पहिला डोस घेणाऱ्यांसाठी ५० लस दिल्या. पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या प्रत्येक केंद्रावर जास्त झाली. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. काही केंद्रांवर मोठा गोंधळही झाला. लस न मिळाल्याने अनेकांचा हिरमोड झाला.
डेल्टा प्लसपासून संरक्षण करण्यासाठी लसीकरण अत्यंत आवश्यक असल्याचे केंद्र शासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, लसींचा साठा उपलब्ध करून दिल्या जात नाही. पाच दिवसांपासून शहरात लसीकरण मोहीम बंद होती. सोमवारी रात्री मनपाला फक्त १० हजार डोस शासनाकडून प्राप्त झाले. त्यानुसार महापालिकेने ३९ केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था केली. प्रत्येक केंद्रात दीडशे लसी देण्यात आल्या. सकाळपासूनच नागरिकांनी लस घेण्यासाठी अलोट गर्दी केली. हर्सूल व जयभवानीनगर, शिवाजीनगर येथील केंद्रांत नागरिक हमरीतुमरीवर उतरले. केंद्रांवरील कर्मचाऱ्यांनी समजूत काढल्यानंतर गोंधळ काहीअंशी कमी झाला. लसीकरणाला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असला तरी लसींच्या तुटवड्यामुळे अनेकांचा भ्रमनिरास होत आहे. बहुतांश केंद्रांवर टोकन पद्धतीचा अवलंब केला जात आहे. टोकन मिळविण्यासाठी सकाळी ७ वाजेपासून नागरिक रांगा लावत आहेत.
---------
दिवसभरात १० हजार लस संपल्या
महापालिकेने शहरात दररोज १८ ते २० हजार नागरिकांचे लसीकरण करता येईल, अशी व्यवस्था केली आहे. शासनाकडून १० ते १२ हजार लस मिळत आहेत. त्यामुळे लसींचा साठा एकाच दिवसात संपत आहे. सोमवारी रात्री मिळालेल्या लसी एकाच दिवसात संपल्या. काही केंद्रांवर उरलेल्या लसींतून बुधवारी काही केंद्रांवर लसीकरण केले जाईल, असे आरोग्य विभागाने कळविले आहे.