भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणादरम्यान गोंधळ.....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:03 IST2021-05-07T04:03:51+5:302021-05-07T04:03:51+5:30
कायगाव : भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरुवारी लसीकरणासाठी तालुक्याच्या बाहेरील हजारो नागरिकांनी गर्दी केली. ऑनलाईन बुकींग करून शहरी भागातून ...

भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणादरम्यान गोंधळ.....
कायगाव : भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरुवारी लसीकरणासाठी तालुक्याच्या बाहेरील हजारो नागरिकांनी गर्दी केली. ऑनलाईन बुकींग करून शहरी भागातून आलेेल्या नागरिकांच्या लसीकरणाला स्थानिकांनी कडाडून विरोध केल्याने मोठा गोंधळ उडाला. त्यामुळे येथे पोलिसांना पाचारण करावे लागले होते.
ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रावर शहरी भागातील नागरिकांच्या लसीकरणाला स्थानिक नागरिकांनी प्रचंड विरोध केला. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावातील लोकांनाच प्राधान्याने लस द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली.
बुधवारी सायंकाळी भेंडाळा केंद्रात कोव्हॅक्सीन लसीचे ४०० डोस मिळाले आहेत. तर कॉव्हीशिल्डचे १५० डोस देण्यात आले. यातून १८ ते ४४ वयोगटासाठी ऑनलाईन बुकिंगद्वारे ६ मे रोजीसाठी सुमारे १८० जणांनी ऑनलाईन बुकिंग केली. लसीकरणाच्या ॲपवर ऑनलाईन लसींचा साठा दिसत असल्याने यात औरंगाबाद शहरासह अनेक ठिकाणाहून नागरिकांनी नोंदणी केली. गुरुवारी सकाळी ८ वाजेपासून नागरिक लसीकरणासाठी केंद्रावर जमले. दुसरीकडे भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुमारे ४३ गावांतील ज्या नागरिकांनी पहिला डोस घेतला होता, आणि त्यांचा दुसरा डोस घेण्याची तारीख आली होती असे शेकडो नागरिकही गुरुवारी सकाळी केंद्रावर हजर झाले होते. एकाच वेळी पहिला आणि दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांचा गोंधळ उडाला. यामुळे वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत नरवडे यांनी गंगापूर पोलिसांना माहिती देऊन पोलीस पथक पाठविण्याची मागणी केली. दरम्यान, प्रशासनाने १८ ते ४४ वयोगटासाठी ऑनलाईन बुकिंगद्वारे पहिला डोस देण्यासाठी भेंडाळा केंद्रात कोव्हॅक्सीन लसीचे ४०० डोस पाठविले खरे, मात्र दुपारी ३.१५ वाजेपर्यंत बुकिंग झालेल्या नागरिकांचा ऑनलाईन डाटा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध झाला नाही. त्यामुळे १८- ४४ चे लसीकरण सुरू होण्यासाठी उशीर झाला. केंद्राबाहेर रांगा लाऊन उभ्या असणाऱ्या नागरिकांना तब्बल ६ तास उन्हात ताटकळत उभे राहावे लागले. यात काही नागरिक लसीकरणासाठी ४० ते ५० कि.मी. अंतरावरून आलेले होते. त्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. ऑनलाईन नियंत्रण ठेवणारी यंत्रणा आणि भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्यात समन्वय नसल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे येथे जमलेल्या नागरिकांनी सांगितले.
चौकट
कन्टेन्मेंट झोन असूनही नियमांचा फज्जा
भेंडाळा गाव कोरोना कंटेन्मेंट क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. जवळील कायगावसुद्धा कंटेन्मेंट क्षेत्र आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट असणाऱ्या गावात लसीकरणाला कोणतेही सोशल डिस्टनसिंग पाळण्यात आले नाही. कोरोनाच्या नियमांना फाटा देत नागरिकांनी गर्दी केल्याने स्थानिक नागरिकांत प्रचंड असंतोष पसरला आहे. कोरोनापासून बचाव करणाऱ्या प्रशासनाने लसीकरण मोहिमेत कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी कोणतीही काळजी घेतलेली नाही.
कोट
स्थानिक नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण व्हावे, यासाठी जास्तीचे डोस देऊन आरोग्य केंद्राने लसीकरण मोहीम राबवावी. ज्यांनी पहिला डोस घेतला आहे, त्यांना अगोदर दुसरा डोस द्यावा. त्यानंतर उर्वरित नवीन लोकांचे लसीकरण राबवावे.
- पोपट गाडेकर, माजी पं. स. सभापती
कोट
ऑनलाईन बुकिंग करून बाहेरील नागरिक ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आलेल्या लसीवर अतिक्रमण करीत आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना ऑनलाईन लसीचे बुकिंग करता येत नाही. आरोग्य विभागाने त्यासाठी वेगळे नियम तयार करावे.
- रामेश्वर परभणे, माजी सरपंच, भेंडाळा.
फोटो :
भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रावर गुरुवारी लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.
060521\img_20210506_101725_1.jpg
भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रावर गुरुवारी लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.