मनपा ‘दौऱ्या’वर ठाम !
By Admin | Updated: November 30, 2015 23:31 IST2015-11-30T23:20:22+5:302015-11-30T23:31:24+5:30
आशपाक पठाण , लातूर पाण्यासारख्या गंभीर समस्येकडे कानाडोळा करुन एकही प्रस्ताव शासन दरबारी न पाठविणारी लातूर महापालिकेच्या आपल्या तिजोरीतील ३२ लाख रुपये मात्र अभ्यास ‘दौऱ्यावर’

मनपा ‘दौऱ्या’वर ठाम !
आशपाक पठाण , लातूर
पाण्यासारख्या गंभीर समस्येकडे कानाडोळा करुन एकही प्रस्ताव शासन दरबारी न पाठविणारी लातूर महापालिकेच्या आपल्या तिजोरीतील ३२ लाख रुपये मात्र अभ्यास ‘दौऱ्यावर’ उधळायला सज्ज झाली आहे. अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली नगरसेवक केरळच्या सहलीवर नगरसेवकांना नेऊन पैशाचा चुराडा करु पाहणारे पदाधिकारी आणि अधिकारी स्थायीत आयत्या वेळी विषय आणून संमत करतात हे ही अधिनियमाला धरुन नसल्याचे पुढे आले आहे, मात्र ‘पण लक्षात कोण घेतो ’ या ह. ना. आपटेंच्या कादंबरीतील शब्दांप्रमाणे लातूरकर हा बिनपैशाचा ‘तमाशा’ पहात आहेत.
नव्याने महापालिका झालेल्या लातूर मनपा सभागृहातील नगरसेवकांचा जेमतेम दीड वर्षांचा कार्यकाल ‘शिल्लकी’ला राहीलाय. यापूर्वी दोनवेळा रद्द झालेल्या अभ्यास दौऱ्याला आता १० डिसेंबरचा मुहूर्त लागलाय.पालिकेच्या कार्यपध्दतीचा अभ्यास व्हावा तसेच कायदेविषयक माहिती मिळावी यासाठी ‘सभागृहाचे कामकाज’ या विषयावर हा अभ्यास दौरा आहे. अखिल भारतीय स्थानिक स्वराज संस्था नवनिर्वाचित सदस्यांना प्रशिक्षणासाठी अशी शिबिरे आयोजित करते. यापूर्वीही अशी अनेक पत्रे मनपाला अखिल भारतीय स्थानिक स्वराज संस्थेने पाठविली आहेत. परंतु केरळचे प्रशिक्षण मनपाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी फारच मनावर घेतले. एवढा विरोध होऊनही पदाधिकारी हट्टालाच पेटले आहेत. एकीकडे मनपात किरकोळ कामे घेऊन गेलेल्या नागरिकांची कामे होत नाहीत. नगरसेवकांनाही त्याचा प्रत्यय आला़ कामे होत नसल्याने अनेकजण सत्ताधारी नगरसेवक प्रशासनासोबत वाद घालतात़ वीज, पाणी, रस्ते आदी सुविधांसाठी वारंवार मनपाकडे खेटे मारल्यावरही कामे होत नाहीत़ सामान्य नागरिकांना मात्र खेटे मारावे लागतात़ कोण कर्मचारी कुठे काम करतोय, शिपाई कोण, विभाग प्रमुख कोण? याची ओळख अनेक नगरसेवकांना अजूनही झाली नाही़ असे समस्यांचे डोंगर असताना अभ्यासासाठी ‘फिल्डवर्क’ सोडून दौरेच का लागतात ? असा प्रश्न आहे.
केरळच्या अभ्यास दौऱ्याबाबत महापौर अख्तर शेख, उपमहापौर कैलास कांबळे म्हणाले, नव्याने निर्माण झालेल्या महापालिका सदस्यांसाठी अभ्यास दौरा आवश्यक आहे़ स्थायी समितीच्या बैठकीत दौऱ्याला मंजुरी मिळाली आहे़
४सध्या दौऱ्याचे नियोजन करण्यात येत असून काही टूर कंपन्यांकडून तिकीट दरासंदर्भात माहिती मागविली आहे़ एकदा निश्चित झालेला दौरा आता रद्द केला जाणार नाही, असे महापौरांनी सांगितले.
४उपमहापौर कांबळे म्हणाले, १० डिसेंबर रोजी सर्व सदस्य केरळच्या अभ्यास दौऱ्यासाठी रवाना होतील़ यात कसलाही बदल केला जाणार नाही़ आम्ही आता तयारीला लागलो आहोत़ मनपा नवीन आहे. पहिल्यांदाच हा अभ्यास दौरा आयोजित केला आहे. त्यानुसार दौरा होईल.
नगरसेवकांच्या केरळ अभ्यास दौऱ्याला स्थायीच्या सभेत ऐनवेळचा विषय म्हणून घेत मान्यता देण्यात आली. मनपा अधिनियमनानुसार ‘आर्थिक मान्यते’च्या विषयाला ऐनवेळचा विषय म्हणून मान्यताच घेता येत नाही. मूळ सभेत विषय नसताना जर मूळ सभेने धोरण ठरविलेले असेल तर बजेटमधील तरतुदीनुसार घेताही येतो. परंतु मूळ सभेने तरी अभ्यास दौऱ्यांचे धोरण कुठे ठरविले आहे. जर मूळ सभेतच यावर चर्चा नाही तर थेट स्थायीत आयत्या वेळी चर्चा करायची आणि अंमलबजावणी करायची हे महापालिकेच्या कोणत्या अधिनियमातून होत आहे ? याचे उत्तर महापौर अख्तर मिस्त्री, उपमहापौर कैलास कांबळे आणि आयुक्त सुधाकर तेलंग लातूरकरांना देतील काय ?