आत्मविश्वास हेच स्त्रीचे खरे सौंदर्य
By Admin | Updated: September 24, 2014 01:06 IST2014-09-24T00:50:34+5:302014-09-24T01:06:24+5:30
औरंगाबाद : सध्याच्या युगात स्त्रीने बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक विकास व वैचारिक प्रगतीला जास्त महत्त्व द्यायला हवे. वातावरण असुरक्षित होत असताना स्त्रियांनी स्वसंरक्षणात सक्षम होणे गरजेचे आहे,

आत्मविश्वास हेच स्त्रीचे खरे सौंदर्य
औरंगाबाद : सध्याच्या युगात स्त्रीने बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक विकास व वैचारिक प्रगतीला जास्त महत्त्व द्यायला हवे. वातावरण असुरक्षित होत असताना स्त्रियांनी स्वसंरक्षणात सक्षम होणे गरजेचे आहे, अशी भावना ज्येष्ठ स्त्रीवादी विचारवंत विद्या बाळ यांनी व्यक्त केली.
डॉ. सौ. इं. भा. पाठक महिला कला महाविद्यालयाच्या विद्यार्थी संसद उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. मराठवाडा लीगल अँड जनरल सोसायटीचे उपाध्यक्ष अॅड. जे. के. वासडीकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर, प्राचार्या डॉ. राजकुमारी गडकर, प्रा. दिलीप दोडके, प्रा. विदुल सुकळीकर, संसद सचिव गौरी जहागीरदार, शिल्पा पवार, दिशा वडमारे आदी उपस्थित होते. विद्या बाळ यांनी संसद सदस्यांना शपथ दिली. यावेळी बारावी बोर्ड व पदवी परीक्षेतील गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात प्रीती जैन, अश्विनी अवचार, रूपाली चिते, अंकिता पवार, जयश्री हिवराळे, उषा नागवे, प्रियंका गुप्ता, धनश्री जामकर, सुभद्रा गुरुसहानी व करिष्मा पठाण यांचा समावेश होता.
डॉ. बाळ म्हणाल्या, बाह्य सौंदर्य टिकाऊ नसून दिखाऊ आहे. जाहिरातींतून स्त्रीला केवळ शोभेची बाहुली या रूपात समोर आणले जाते. तेव्हा स्त्रीने माणूस म्हणून स्वत:ची प्रतिमा ठळक केली पाहिजे. महाराष्ट्रात समाजसुधारकांची मोठी प्रतिमा आहे. नव्या काळातील आधुनिक जीवनशैलीचा स्वीकार करताना स्त्रीने आपले विचारही खुले व आधुनिक बनवावेत. आत्मसन्मान व आत्मविश्वास हेच खऱ्या सौंदर्याचे गमक आहे.
ठाकूर म्हणाल्या, तरुण वयातच स्वत:च्या क्षमता ओळखून स्त्रियांनी प्रयत्नशील व्हावे. स्वत:ची बलस्थाने ओळखून त्यांचा विकास करावा. कुठल्याही विद्यापीठात न मिळणारी ‘माणुसकीची पदवी’ मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहा.
वासडीकर यांनी अध्यक्षीय समारोप केला. प्रा. डॉ. पराग चौधरी, प्रा. अनिता अग्रवाल व डॉ. सुनीता बाजपाई यांनी संचालन केले.