उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडली
By Admin | Updated: June 30, 2016 01:24 IST2016-06-30T00:57:48+5:302016-06-30T01:24:28+5:30
औरंगाबाद : पहाडसिंगपुरा, रेणुकामातानगर, ताजमहाल कॉलनी येथील गट नंबर ९९ मधील १८ एकर २९ गुंठे जमीन संपादित करा. संपादित करून रहिवाशांच्या नावावर करून द्या,

उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडली
औरंगाबाद : पहाडसिंगपुरा, रेणुकामातानगर, ताजमहाल कॉलनी येथील गट नंबर ९९ मधील १८ एकर २९ गुंठे जमीन संपादित करा. संपादित करून रहिवाशांच्या नावावर करून द्या, या मुख्य मागणीसाठी तेथील विस्थापित झालेल्या रहिवाशांनी भारतीय कम्युनिस्ट पार्टीतर्फे तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. बुधवारी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी पाच महिला उपोषणकर्त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून घाटी रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले.
२७ जूनपासून पहाडसिंगपुरा, रेणुकामातानगर आणि ताजमहाल कॉलनी येथील रहिवासी उपोषणाला बसले आहेत. प्रशासनाने तेथील घरे नावावर करून द्यावीत, अशी मागणी उपोषणकर्त्यांची आहे.
जोपर्यंत तोडगा निघत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील, असे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे अॅड.अभय टाकसाळ यांनी सांगितले. ते म्हणाले की, पहिल्या दिवशी अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे आणि प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी भेटीसाठी बोलविले होते. आम्ही त्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून सदर जमीन येथील रहिवाशांना देण्याची मागणी केली. मात्र, ते असा प्रस्ताव शासनाकडे पाठविणार असल्याचे बोलले.
आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, उपोषणाचा तिसरा दिवस असल्यामुळे उपोषणकर्त्या पाच महिलांची तब्येत बिघडली.