विजेअभावी शेतवस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:12 IST2021-01-08T04:12:15+5:302021-01-08T04:12:15+5:30
कायगाव : अगरवाडगाव आणि भिवधानोरा शिवारातील शेतवस्त्यांवर राहणाऱ्या अनेक कुटुंबांना आजही विजेअभावी अंधारात राहावे लागत आहे. त्यामुळे या नागरिकांना ...

विजेअभावी शेतवस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांचे हाल
कायगाव : अगरवाडगाव आणि भिवधानोरा शिवारातील शेतवस्त्यांवर राहणाऱ्या अनेक कुटुंबांना आजही विजेअभावी अंधारात राहावे लागत आहे. त्यामुळे या नागरिकांना हिंस्र प्राणी आणि चोरट्यांच्या भीतीने जीव मुठीत घेऊन जीवन जगावे लागत आहे.
गंगापूर तालुक्यातील अगरवाडगाव आणि भिवधानोरा शिवारात जवळपास २० कुटुंबे एकमेकांचा आधार करून शेतवस्त्यांवर राहतात. शेती करण्यासाठी येथे राहण्यावाचून दुसरा पर्याय त्यांच्याकडे नाही. या वस्त्यांच्या सुमारे एक कि.मी. अंतरापर्यंत महावितरण कंपनीची वीज पोहोचलेली आहे. मात्र, या वस्त्या अजूनही विजेपासून दूर असल्याने हे नागरिक विजेविना राहत आहेत.
गुरुवारी या सर्व शेतकऱ्यांनी महावितरणच्या उपविभागीय अभियंता कार्यालयात धडक मारली. वीज वितरण व्यवस्था सर्वत्र पोहोचलेली असताना आम्हाला आजही वीजपुरवठा होत नसल्याची कैफियत या नागरिकांनी महावितरणसमोर मांडली.
पंधरा दिवसांत आम्हाला वीजपुरवठा झाला नाही, तर पूर्ण कुटुंबांतील सदस्य महावितरणच्या कार्यालयासमोर राहुटी टाकून आंदोलन करतील, असा इशारा भाऊसाहेब शेळके, दादासाहेब चव्हाण, आरीफ पठाण, मदन चव्हाण, राधाकृष्ण चव्हाण, गणेश जावळे, युनूस शेख आदी शेतकऱ्यांनी दिला.
----------
फोटो : अगरवाडगाव, भिवधानोरा शिवारातील नागरिकांनी वीजजोडणी करून देण्यात यावी, या मागणीसाठी गुरुवारी महावितरणाला निवेदन दिले.