महागाईने मोडले सामान्यांचे कंबरडे

By Admin | Updated: July 3, 2014 00:19 IST2014-07-02T23:38:01+5:302014-07-03T00:19:53+5:30

उस्मानाबाद : एखादा मोठा पाऊस पडला की, दहा ते बारा दिवसातच बाजारपेठेतील पालेभाज्याची आवक वाढते. आवक वाढताच दर कमी होतात.

Compromised by inflation | महागाईने मोडले सामान्यांचे कंबरडे

महागाईने मोडले सामान्यांचे कंबरडे

उस्मानाबाद : एखादा मोठा पाऊस पडला की, दहा ते बारा दिवसातच बाजारपेठेतील पालेभाज्याची आवक वाढते. आवक वाढताच दर कमी होतात. मात्र यंदा जून महिना सरला तरीही वरुणराजाची कृपादृष्टी झालेली नाही. त्यामुळे खरीप पेरणी धोक्यात आली आहे. तर दुसरीकडे पालेभाज्यांची आवक घटल्याने हे दरही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.
गतवर्षीप्रमाणेच यंदाही पाऊस बऱ्यापैकी होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र याच्या उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. रोहिणी आणि मृग ही दोन्ही नक्षत्रे कोरडी गेली. त्यामुळे शेतकऱ्यांना पालेभाज्याची लागवड करता आली नाही. याचाच परिणाम म्हणून बाजापेठेमध्ये पालेभाज्या दिसेनाशा झाल्या आहेत. तुरळक प्रमाणात भाज्या विक्रीसाठी येत असल्या तरी त्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. मागील दोन- अडीच महिन्यापूर्वी एक किलो वांग्यासाठी ३० ते ३५ रुपये मोजावे लागत होते. आज हा दर ४५ वर जाऊन ठेपला आहे. पातीचे कांदेही महागले आहेत. एका जुडीसाठी जवळपास १५ रुपये द्यावे लागत आहेत.
हिरवी मिरचीही अधिक तिखट झाली आहे. पाव किलो मिरचीसाठी १२ ते १५ रुपये लागत आहेत. कांदाही सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणू लागला आहे. एक किलो कांद्यासाठी ४० रुपये मोजावे लागत आहेत. कोथिंबीर तर प्रचंड भाव खाऊन जात आहे. एका जुडीसाठी २० ते २५ रुपये सोडावे लागत आहेत. मेथी, पालक आणि चुका या पालेभाज्याही प्रचंड महागल्या आहेत. १५ रुपयाच्या खाली एकही भाजी मिळत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आहारातून पालेभाज्या हद्दपार होण्याच्या मार्गावर आहेत. जे कुटुंब चार ते पाच पालेभाज्या खरेदी करत असत ते आज १ ते २ वर येऊन ठेपले आहे. याला पर्याय म्हणून सर्वसामान्य मंडळी आता विविध प्रकारच्या दाळींसोबतच मटकी, वाटाण्यांचा वापराकडे वळल्याचे काही भाजी विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
(प्रतिनिधी)
...तर दर आणखी कडाडणार
हवामान खात्याकडून ५ जुलैपर्यंत पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला जात आहे. असे असले तरी पाऊस लांबल्यानंतर पालेभाज्याच्या दरात वाढ होऊ शकते, असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
कसे चालवायचे घर ?
तीन महिन्यापूर्वी येथील आठवडी बाजारात गेल्यानंतर शंभर ते दीडशे रुपयामध्ये कुटुंबाला ८ दिवस पुरेल एवढा भाजीपाला येत असे. मात्र मागील दोन आठवड्यापासून तेवढ्याच भाजीपाल्यासाठी अडीचशे रुपयेही पुरत नाहीत. उत्पन्नात मात्र वाढ झालेली नाही. तर सर्वसामान्यांनी कुटुंब चालवायचे तरी कसे असा सवाल राम माळी या बाजारकरुंनी उपस्थित केला.

Web Title: Compromised by inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.