१५ जुलैपूर्वी उद्दिष्ट पूर्ण करा
By Admin | Updated: June 28, 2014 01:17 IST2014-06-28T00:50:20+5:302014-06-28T01:17:40+5:30
जालना : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी ७९७ कोटी रूपयांच्या पीक कर्जाचे वाटपांचे उद्दिष्ट असून, १५ जुलैपर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री राजेश टोपे यांनी
१५ जुलैपूर्वी उद्दिष्ट पूर्ण करा
जालना : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी ७९७ कोटी रूपयांच्या पीक कर्जाचे वाटपांचे उद्दिष्ट असून, १५ जुलैपर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी आयोजित आढावा बैठकीतून दिले.
जिल्ह्यातील पीक कर्जाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बँकांचे व्यवस्थापन, अधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी ए.एस.आर.नायक, बँक आॅफ महाराष्ट्राचे विभागीय व्यवस्थापक राजकिरण भोईर, जिल्हा उपनिबंधक डॉ.अशोक खरात, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घटगे, जि.प.चे कृषी अधिकारी गंजेवार, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक पी.जी. भागवतकर, अग्रणी बँकेचे प्रभारी व्यवस्थापक यू. आर. होळकर, जि.म. स. बँकेचे नलावडे उपस्थित होते.
जिल्ह्यात सुमारे साडेपाच लाख खातेदार शेतकरी आहेत. परंतु एक लाख ८४ खातेदारांनाच पीक कर्जाचे वाटप केले जाते. दरवर्षी पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळते, परंतु, नवीन शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी अडवणूक केली जाते. नव्याने पीक कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा निबंधक कार्यालयाने तयार करून बँकाकडे द्याव्यात, जेणे करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज देता येईल, अशा सूचना केल्या. १ जुलै २०१४ नंतर प्रामुख्याने जिल्ह्यातील २५ टक्के खातेदारांना नव्याने कर्ज द्यावे, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.
आजपर्यंत जिल्ह्यातील बँकांनी यावर्षीचे सुमारे ५० टक्के पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट केले आहे. परंतु कर्ज वाटपाचा वेग वाढला पाहिजे. बँकांनी पीक कर्ज मेळाव्यांचे आयोजन करावे, असेही टोपे यांनी नमूद केले.
जिल्ह्याच्या पत आराखड्यात पीक कर्जासोबतच इतर कर्जाचे उद्दिष्टही निश्चित करण्यात येते. मात्र यातील कृषीपूरक साधने, अवजारे, विहीर, पाइपलाईन, ट्रॅक्टर आदीसाठी मात्र फारच कमी कर्जपुरवठा केला जातो. यासाठी कर्जाचा पुरवठा करण्यात यावा, असे आवाहन त्यांनी केले. बँकांनी या आवाहनास प्रतिसाद देत कर्ज देण्याचे मान्य केले.
यावर्षी पीक कर्जाचे उद्दिष्ट २४ टक्क्यांनी वाढवून ७९७ कोटी रूपयांचे करण्यात आले आहे. गतवर्षी पीक कर्जवाटपात विभागातून प्रथम क्रमांक पटकावला होता. उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजेच एकूण ८०० कोटी ६५ लाख रूपयांचे पीक कर्जाचे वाटप करण्यात होते. यात खरिपासाठी ६२४ कोटी ५१ लाख तर रबीसाठी १७६ कोटी १४ लाख रूपयांचे पीक वाटप करण्यात आले. (प्रतिनिधी)
शेतकरी, ग्राहकांना सन्मानाची वागणूक देण्याच्या सूचना
बँकांमध्ये शेतकरी आणि नागरिकांना अतिशय वाईट वागणूक मिळत आहे, अशी खंत व्यक्त करून पालकमंत्री टोपे यांनी बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वर्तनात, वागणुकीत बदल करण्याची गरज असल्याचे सांगितले. बँकेत येणाऱ्या ग्राहकांना आणि शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे, त्यांना विना व्यत्यय सेवा देण्यात यावी, त्याकरिता बँकांनी लोकाभिमुख होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
बँकांच्या कामासाठी दलालाला पैसे दिल्याशिवाय कामे होत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांना विविध कागदपत्रांसाठी पैसे मोजावे लागतात, या गोष्टी त्वरीत थांबविण्याची गरज असल्याचे टोपे यांनी सांगितले.