शहरात ५० किमीचे काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2017 00:22 IST2017-04-08T00:21:29+5:302017-04-08T00:22:11+5:30
जालना : शहरातील निजामकालीन अंतर्गत जलवाहिनी बदलून त्याजागी नवीन जलवाहिनी अंथरण्यात येत आहे

शहरात ५० किमीचे काम पूर्ण
जालना : शहरातील निजामकालीन अंतर्गत जलवाहिनी बदलून त्याजागी नवीन जलवाहिनी अंथरण्यात येत आहे. सुमारे ३९१ किमी जलवाहिनीचे काम होणार असून, त्यापैकी ५० ते ६० कि.मी.चे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पुढील दीड वर्षांत पूर्ण होणार आहे. गरजेपुरता आराखडा
काढून हे काम करण्यात येत आहे.
शहरातील अंतर्गत जलवाहिनी निजामकालीन असून जीर्ण झाली आहे. परिणामी दररोज हजारो लिटर पाण्याची गळती होते. जुनी जलवाहिनी बदलून त्याजागी नवीन जलवहिनी अंथरण्याची मागणी होती. शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर नवीन जलवाहिनी अंथरण्यास मान्यता मिळाली. राज्य शासनाच्या योजनेतून सुमारे १२७ कोटींची ही योजना राबविण्यात येत आहे. यासाठी पहिला हप्ता म्हणून पालिकेला ४८ कोटींचा निधी प्राप्त झाला असून, शहरात नऊ झोन आहेत. त्यात ५० ते ६० किमी जलवाहिनी अंथरण्याचे काम झाले आहे. ४ इंच एचडीपी पाईप अंथरण्यात येत आहे. शहरातील शिवनगर, चंदनझिरा, आझाद मैदान, इंदिरानगर, शिवनगर आदी भागात हे काम पूर्ण झाल्याची माहिती पाणीपुरवठा अभियंत्यांनी दिली. जलवाहिनीसाठी लागणारे पाईप, व्हॉल्व्ह तसेच इतर साहित्य आले आहे. सर्व्हे क्रमांक ४८८ मध्ये हे पाईप ठेवण्यात आले आहे. ५० किमीचे काम पूर्ण झाले असून, रस्त्यांची कामे
पूर्ण झाल्यावर जलवाहिनी अंथरण्याच्या कामास गती येईल असे पाणीपुरवठा विभागातून सांगण्यात आले.
शहरातील नवीन वसाहतीत जलवाहिनी अंथरण्याचे काम सुरू आहे. हे काम झाल्यावर मुख्य रस्त्यावर जलवाहिनी अंथरण्यात येईल.