महावितरणच्या बैठकीत तक्रारींचा पाऊस
By Admin | Updated: July 8, 2017 00:06 IST2017-07-08T00:05:25+5:302017-07-08T00:06:40+5:30
सेलू : ग्रामीण भागातील बिकट बनत चाललेल्या वीजप्रश्नांवर आ. विजय भांबळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

महावितरणच्या बैठकीत तक्रारींचा पाऊस
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : ग्रामीण भागातील बिकट बनत चाललेल्या वीजप्रश्नांवर आ. विजय भांबळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची साई नाट्य मंदिरात ७ जुलै रोजी बैठक घेतली. त्यात अनेक गावच्या शेतकऱ्यांनी विजेच्या संदर्भातील अनेक तक्रारी करीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
शहरातील नगरपालिकेच्या श्री साईनाट्य गृहात ग्रामीण भागासह शहरी भागातील वीज प्रश्नावर आ. विजय भांबळे यांनी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती. या बैठकीला ग्रामीण भागातील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. लघुदाब वाहिनी जागोजागी जीर्ण झाली आहे. ही वाहिनी चाळीस वर्षांपूर्वीची असल्यामुळे ग्रामीण भागात वीज पुरवठा सुरळीत होत नाही. तसेच एलटी लाईन किरकोळ तांत्रिक कारणामुळे बंद पडत आहे. त्यामुळे कृषीपंंपांना वीज मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. कीटकॅट, केबल, बॉक्स इ. साहित्य जळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. ११ के.व्ही. वाहिन्यांची दुरुस्ती करणे आवश्यक झाले आहे. परंतु, साहित्य उपलब्ध होत नसल्यामुळे दुरुस्तीचे काम रखडले आहे. परिणामी पाणी असूनही शेतकऱ्यांना विजेअभावी पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. तसेच भारनियमनाव्यतीरिक्त गावांचाही वीज पुरवठा तासन्तास खंडित होत आहे. नवीन डीपी, लोंबकळलेल्या तारा, नवीन वीजजोडणी, डीपी दुरुस्ती इ. प्रश्न या बैठकीत शेतकऱ्यांनी उपस्थित केले. तांत्रिक कारणामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार ग्रामीण भागात वाढले आहेत, अशा वेळी संबंधित कर्मचारी दुरुस्तीचे काम करण्यास विलंब करीत असल्याची कैफियत शेतकऱ्यांनी मांडली. दरम्यान, ग्रामीण भागातील विजेचे प्रश्न एका महिन्यात निकाली काढा अन्यथा संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा आ. भांबळे यांनी दिला. यावेळी जि. प. सभापती अशोक काकडे, जि. प. सदस्य राजेंद्र लहाने, उपविभागीय अभियंता राजेश मेश्राम, राकॉँचे जिल्हा उपाध्यक्ष विनायक पावडे, अॅड. बाळासाहेब रोडगे, माऊली ताठे, सुधाकर रोकडे, अज्जू कादरी यांच्यासह महावितरणचे शाखा अभियंता व कर्मचारी उपस्थित होते.