पोलिस कोठडीत मारहाणीची तक्रार
By Admin | Updated: April 12, 2015 00:59 IST2015-04-12T00:59:53+5:302015-04-12T00:59:53+5:30
तुळजापूर : तुळजापूर पोलिस ठाण्याच्या कोठडीत ठेवले असताना कोठडीतील राजाभाऊ माने याने हल्ला केल्याची तक्रार विशाल छत्रे याने पोलिस उपअधीक्षकांकडे केली आहे

पोलिस कोठडीत मारहाणीची तक्रार
तुळजापूर : तुळजापूर पोलिस ठाण्याच्या कोठडीत ठेवले असताना कोठडीतील राजाभाऊ माने याने हल्ला केल्याची तक्रार विशाल छत्रे याने पोलिस उपअधीक्षकांकडे केली आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्याचे अधिकारी तक्रार घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोपही छत्रे याने केला आहे. दरम्यान, पोलिसांनी शनिवारी छत्रे याच्याविरूध्द आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा तुळजापूर ठाण्यात दाखल केला आहे.
सदर हल्ला झाल्यानंतर तुळजापूर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी पोलिस कोठडीतून बाहेर काढून तुळजापूर शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी संबंधित डॉक्टरांना घडलेली हकीकत सांगताना तेथे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तक्रार देवू नकोस, अशी धमकी दिल्याचेही छत्रे याने म्हटले आहे. दरम्यान, तुळजापूर येथे उपचारासाठी थांबलो असताना त्रास होत असल्याने मला पुढील उपचारासाठी उस्मानाबाद शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. येथेही पोलिस कर्मचाऱ्यांना जबाब घेण्याबाबतची विनंती केली असता त्यांनीही नकार दिल्याचे सांगत याप्रकरणी संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, असे छत्रे याने पोलिस उपअधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
स्वत: मारून घेतले
विशाल छत्रे आणि राजा माने या दोघांमध्ये सकाळीच भांडण झाले होते. त्यामुळे त्या दोघांविरूध्द अदखलपात्र गुन्हा नोंदवून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. त्यानुसार या दोघांनाही पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते. त्यावेळी विशाल छत्रे याने स्वत:च स्वत:ला मारहाण करून घेतली असून, त्याच्या आरोपात तथ्य नसल्याचे तुळजापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानोबा मुंढे यांनी सांगितले. (वार्ताहर)