महावितरणची सक्तीची वसुली; ग्राहकांत नाराजी
By Admin | Updated: April 4, 2016 00:40 IST2016-04-04T00:30:50+5:302016-04-04T00:40:19+5:30
भादा : औसा तालुक्यातील भादा व परिसरातील वीज ग्राहक जादा वीजबिलामुळे हैराण झाले असतानाच आता महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सक्तीची वसुली केली जात आहे़ त्यामुळे ग्राहकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे़

महावितरणची सक्तीची वसुली; ग्राहकांत नाराजी
भादा : औसा तालुक्यातील भादा व परिसरातील वीज ग्राहक जादा वीजबिलामुळे हैराण झाले असतानाच आता महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सक्तीची वसुली केली जात आहे़ त्यामुळे ग्राहकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे़
भादा व परिसरात एकूण ३ हजार २०० वीज ग्राहक आहेत़ भादा गावात ७३५ घरगुती वीजग्राहक आहेत़ गावात विद्युत तारेवर आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्यांची संख्याही काही प्रमाणात आहे़ गेल्या काही महिन्यांपासून घरगुती वीजग्राहकांना ज्यादा वीजबिल देण्यात येत असल्याने ग्राहक वैतागले आहेत़ वीजबिलाची दुरुस्ती करावी म्हणून वारंवार हेलपाटे मारत आहेत़ मात्र, वीजबिल अगोदर भरा, असे महावितरणचे अधिकारी सांगत आहेत़
अशा परिस्थितीत सध्या महावितरणकडून थकित वीजबिलाची सक्तीने वसुली केली जात आहे़ जे ग्राहक थकित वीजबिल भरत नाहीत त्यांचा विद्युत पुरवठा तोडला जात आहे़ दुष्काळी परिस्थितीत महावितरणकडून सक्तीने वसुली केली जात असल्याने ग्राहकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे़
दरम्यान, अधिकृत वीजजोडणी घेण्याऐवजी तारेवर आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे़ परिणामी, विद्युत तारांचे घर्षण होणे, फ्यूज जाणे आदी अडचणींना ग्राहकांना सामोरे जावे लागत आहे़ (वार्ताहर)