कंपनीत चोरी, संशयित दोन तासांत जेरबंद..!
By Admin | Updated: July 7, 2017 01:05 IST2017-07-07T01:04:02+5:302017-07-07T01:05:43+5:30
जालना : येथील औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत सुरक्षारक्षकाला धाक दाखूवन कॉपर वायर लंपास करणाऱ्या चार संशयितांना पोलिसांनी दोन तासांत ताब्यात घेतले.

कंपनीत चोरी, संशयित दोन तासांत जेरबंद..!
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत सुरक्षारक्षकाला धाक दाखूवन कॉपर वायर लंपास करणाऱ्या चार संशयितांना पोलिसांनी दोन तासांत ताब्यात घेतले. जालना-औरंगाबाद रोडवरील एस.बी. वर्कशॉपच्या मागील बाजूस गुरुवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली.
नवीन औद्योगिक वसाहतीमधील आदिनाथ कंपनीत बुधवारी मध्यरात्रीनंतर पाच ते सहा संशयितांनी प्रवेश केला. सुरक्षारक्षकाला चॉपरचा धाक दाखवून कंपनीतील ८० हजारांचे कॉपर वायर चोरून नेले. गस्तीवर असलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाला नियंत्रण कक्षातून या घटनेबाबत माहिती देण्यात आली. गस्त पथकाने तात्काळ सदर कंपनीत पोहचून प्राथमिक चौकशीनंतर संशयितांचा शोध सुरू केला. दरम्यान रात्री तीनच्या सुमारास एस.टी. वर्कशॉपच्या मागील बाजूस काहीजण लपून बसल्याचे दिसले. पोलिसांना पाहून पळणाऱ्या चौघांना गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यांची नावे सागर त्र्यंबक जाधव (२२) रवी त्र्यंबक जाधव (१९), श्याम विष्णू सन्याशी (३०,तिघे रा.चंदनझिरा) व रोहिदास दत्तू गायकवाड (३२,रा. कैकाडी मोहल्ला) अशी आहेत. चौकशीत त्यांनी कॉपर वायर, एक दुचाकी करमाडमधील एका लॉजमधून चार एलसीडी टीव्ही चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी संशयितांकडून एक लाख ६२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. फरार संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, उपनिरीक्षक चयनसिंग घुसिंगे, विश्वनाथ भिसे, कमलाकर अंभोरे, संतोष सावंत,
गोकूळसिंग कायटे, विनोद गडदे, हिरामण फलटणकर, समाधान तेलंग्रे मदन बहुरे, शेख अलताफ यांनी ही कारवाई केली.