धूत ट्रान्समिशनने विकत घेतली स्कॉटलंडची कंपनी
By Admin | Updated: June 23, 2017 01:04 IST2017-06-23T01:01:19+5:302017-06-23T01:04:57+5:30
औरंगाबाद : स्थानिक औद्योगिक क्षेत्राचा पुन्हा एकदा जागतिक स्तरावर दबदबा पाहायला मिळतोय.

धूत ट्रान्समिशनने विकत घेतली स्कॉटलंडची कंपनी
योगेश गोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : स्थानिक औद्योगिक क्षेत्राचा पुन्हा एकदा जागतिक स्तरावर दबदबा पाहायला मिळतोय. जागतिक बाजारपेठेत आपले स्थान अधिक बळकट करण्यासाठी धूत ट्रान्समिशन या स्थानिक कंपनीने स्कॉटलंडमधील टीएफसी केबल्स असेंब्लिज लिमिटेड ही कंपनी खरेदी केली आहे. या व्यवहाराचा आर्थिक तपशील अद्याप उघड करण्यात आलेला नसून लवकरच याबाबत घोषणा केली जाणार आहे.
युरोपमध्ये व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने कंपनीचे हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे. या करारामुळे धूत ट्रान्समिशनला पश्चिम युरोपातील बाजारपेठेत अधिक जोरकसपणे प्रवेश करणे सुकर होईल. मुंबईस्थित गुंतवणूक बँक सिंगी अॅडव्हायजर्स हे या व्यवहाराचे सल्लागार आहेत.
युरोप व भारतातील वाहन आणि औद्योगिक क्षेत्रासाठी विद्युत उपकरणे पुरवठा करणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असणाऱ्या धूत ट्रान्समिशनची स्थापना १९९९ साली झाली. एक लघु उद्योग म्हणून सुरुवात केल्यानंतर वायर हार्नेसिंग क्षेत्रातील झपाट्याने वाढणारी कंपनी म्हणून धूत ट्रान्समिशनने नावलौकिक मिळविला.
मागील १५ वर्षांत वार्षिक २० टक्के दराने कंपनीची वाढ झाली आहे. आजमितीला कंपनीचे पुणे, औरंगाबाद, चेन्नई, मानेसर, पिथमपूर, इंग्लंड आणि स्लोव्हाकिया येथे १३ युनिटस् आहेत. व्होल्वो, पियाजियो, होंडा, बजाज आॅटो, रॉयल एनफिल्ड, सुझुकी आणि सीएनएच अशा स्थानिक व विदेशी कंपन्या धूत ट्रान्समिशनचे प्रमुख ग्राहक आहेत. १९७१ साली स्थापन झालेल्या ‘टीएफसी केबल्स असेंब्लिज’चे स्कॉटलंड आणि स्लोव्हाकियामध्ये युनिटस् आहेत. ते वाहन उद्योगाला अॅनालिटिकल इन्स्ट्रूमेंटस्, वर्क अॅक्सेस प्लॅटफॉर्म, हिटिंग, व्हेंटिलेशन आणि कंट्रोल उपकरणे यासारखी उत्पादने पुरवितात.