विरंगुळा केंद्रात अधिकाऱ्यांचा संचार
By Admin | Updated: April 21, 2016 00:31 IST2016-04-20T23:59:21+5:302016-04-21T00:31:04+5:30
औरंगाबाद : राजकारण आणि प्राध्यापक व अधिकाऱ्यांच्या सेवा-सुविधा यामध्ये व्यस्त असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासनाने विद्यार्थ्यांचे विरंगुळा केंद्रही हिसकावून घेतले आहे.

विरंगुळा केंद्रात अधिकाऱ्यांचा संचार
औरंगाबाद : मागील काही वर्षांपासून व्यवस्थापन परिषद, अधिष्ठाता यांचे राजकारण आणि प्राध्यापक व अधिकाऱ्यांच्या सेवा-सुविधा यामध्ये व्यस्त असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासनाने विद्यार्थ्यांचे विरंगुळा केंद्रही हिसकावून घेतले आहे.
सुमारे पाच वर्षांपूर्वी विद्यापीठात शिकणाऱ्या तसेच विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातून विविध कामांसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने विरंगुळा केंद्र उभारले. मात्र ते विद्यार्थ्यांना खुले होण्याऐवजी तेथे विद्यार्थी कल्याण संचालक तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यालय थाटण्यात आले. त्यामुळे ज्या उद्देशाने हे केंद्र उभे राहिले त्याचा हेतू सफल झाला नाही.
या केंद्रात असणाऱ्या खोल्यांमध्ये कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी कूलरयुक्त अणि एसी केबिनची व्यवस्था करण्यात आली. मात्र, ज्यांच्यासाठी हे केंद्र उभे करण्यात आले ते विद्यार्थी बसस्टॉपजवळील काटेरी बाभळीच्या सावलीत वेळ घालवताना दिसतात.
विद्यार्थ्यांच्या दृष्टीने कोणतीच सोय करायची नाही किंवा त्यांच्यासाठी असलेल्या सुविधा बंद करायच्या हे विद्यापीठाचे विदारक चित्र असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे राहुल तायडे यांनी व्यक्त केली आहे.
विरंगुळा केंद्र हे विद्यार्थ्यांसाठीच उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आपण विद्यापीठ प्रशासनाकडे करणार असल्याचे विद्यार्थी संसदेचे सचिव नामदेव कचरे यांनी सांगितले.