समिती म्हणते, पैशाशिवाय मोल कळणार नाही
By Admin | Updated: May 27, 2014 00:58 IST2014-05-27T00:24:40+5:302014-05-27T00:58:45+5:30
उस्मानाबाद: श्री तुळजा भवानी जिल्हा स्टेडियम समितीने क्रीडा संकुलाच्या देखभाल-दुरूस्तीसाठी वयोवृध्दांपासून विविध खेळ, खेळाडूंसाठी फीस आकारणीचा निर्णय घेतला आहे़

समिती म्हणते, पैशाशिवाय मोल कळणार नाही
उस्मानाबाद: श्री तुळजा भवानी जिल्हा स्टेडियम समितीने क्रीडा संकुलाच्या देखभाल-दुरूस्तीसाठी वयोवृध्दांपासून विविध खेळ, खेळाडूंसाठी फीस आकारणीचा निर्णय घेतला आहे़ या निर्णयाबाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत असून, ‘लोकमत’ने समितीच्या धोरणा याबाबत माहिती घेतली़ शासनाकडून निधी मिळत नसल्याने देखभाल-दुरूस्तीसाठी निधी उपलब्धता करण्यासह पैसे भरल्याशिवाय स्टेडियमचे मोल समजणार नाही ही भूमिका समितीची असल्याचे दिसून आले़ राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने डिसेंबर २०१२ रोजी परिपत्रक काढून क्रीडा संकुलाच्या दुरूस्तीसाठी स्वयंपूर्ण निधी उपलब्ध करण्याबाबत आदेशित केले आहे़ प्रारंभीचे तीन वर्षे क्रीडा संकुलाच्या देखभाल दुरूस्तीसाठी निधी पुरविण्यात आला़ काही निधी येणे बाकी आहे़ त्यामुळे श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियमच्या देखभाल-दुरूस्तीसाठी समितीने फीस आकारण्याचा निर्णय घेतला आहे़ शिवाय चार पैसे भरून मैदानात पाऊल ठेवल्यानंतरच मैदानाच्या सुरक्षेसह इतर बाबींचे महत्त्व सर्वांनाच समजेल असे मत स्टेडियम समितीकडून व्यक्त करण्यात आले आहे़ स्टेडियमच्या देखभाल दुरूस्तीसाठी जवळपास १ लाख २२ हजारांचा खर्च समितीला अपेक्षित आहे़ तर खेळाडू, ज्येष्ठ नागरिक व इतर माध्यमातून मासिक ५० हजार ५०० रूपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे़ उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने लवकरच स्विमिंग पूलसह इतर क्रीडांगणे चांगल्या दर्जाची करून त्याचा वापर सुरू करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी) अशी राहणार फी वॉकिंग ट्रॅकसाठी प्रत्येकी ५० रूपये, स्केटींग रिंगसाठी प्रत्येकी १०० रूपये, फुटबॉलसाठी प्रत्येकी १०० रूपये, जिम हॉलसाठी प्रत्येकी १०० रूपये, पोलिस भरतीचा सराव करणार्यांसाठी प्रत्येकी १०० रूपये, बॅडमिंटनसाठी प्रत्येकी १५० रूपये तसेच क्रिकेट स्पिचसाठी १२००० रूपये फीस निश्चित करण्यात आली आहे़ यातून महिन्याला जवळपास ५० हजार ५०० रूपयांचे उत्पन्न समितीला अपेक्षित आहे़ सूचनांवर विचार होईल क्रीडा संकुलाच्या दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध करून न देण्याचा निर्णय शासनस्तरावर घेण्यात आला असून, समितीने त्यासाठी स्वत: निधी उभारण्याबाबत सांगण्यात आले आहे़ त्यामुळे श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियमच्या देखभाल-दुरूस्तीसाठी समितीने फीस आकारण्याचा निर्णय घेतला आहे़ येथे येणार्या खेळाडुंसह नागरिकांना आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील़ फीसच्या निर्णयाबाबत अनेक सूचना येत आहेत़ या सूचना वरिष्ठांसमोर मांडून त्यावर आवश्यक तो तोडगा काढण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती क्रीडाधिकारी अनिल देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़ यांना मिळणार सवलत क्रीडा समितीने घेतलेल्या निर्णयातून कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉलसाठी येणार्या खेळाडुंसह मैदानी सराव करणार्या शालेय खेळाडूंना सूट देण्यात आली आहे़ या खेळाडूंकडून ओळखपत्रासाठी वार्षिक ५० रूपये आकारण्यात येणार आहेत़ दुरूस्तीसाठी होणारा खर्च क्रीडा संकुलाच्या देखभाल-दुरूस्तीसाठी समितीला जवळपास १ लाख, २२ हजार रूपये लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे़ यात स्टेशनरीसाठी १५००, साहित्यासाठी १५०० रूपये, तीन मैदान सेवकांच्या मानधनासाठी १८०००, वीज बिलासाठी ४०००० रूपये, सात सुरक्षा रक्षकांच्या मानधनासाठी ४२००० रूपये, एका लिपिकासाठी ७००० रूपये, व्यवस्थापकासाठी १०००० रूपये, झेरॉक्स व इतर किरकोळ खर्चासाठी २००० रूपये अपेक्षित आहेत़