आयुक्तांनी दिला धक्का जाता जाता
By Admin | Updated: September 4, 2014 00:56 IST2014-09-04T00:50:53+5:302014-09-04T00:56:54+5:30
आयुक्तांनी दिल्लीतील संस्थेला कंत्राट देऊन सेना नेत्यांना जाता-जाताही ठेंगा दाखविला आहे.

आयुक्तांनी दिला धक्का जाता जाता
औरंगाबाद : महापालिकेच्या भूमिगत गटार योजनेमध्ये मर्जीतल्या कंत्राटदाराला कंत्राट मिळवून देण्यात अपयश आल्यानंतर शिवसेना नेत्यांनी एलईडी पथदिव्यांचे कंत्राट पुण्यातील संस्थेला मिळावे, यासाठी आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे यांच्यावर दबाव टाकला होता. मात्र, आयुक्तांनी दिल्लीतील संस्थेला कंत्राट देऊन सेना नेत्यांना जाता-जाताही ठेंगा दाखविला आहे. स्थायी समितीच्या आजच्या बैठकीत ११२ कोटी रुपयांचे पथदिवे बसविण्याचे कंत्राट इलेक्ट्रॉन लायटिंग सिस्टीम्स प्रा.लि., आणि पॅरागॉन केबल इंडिया (जॉइंट व्हेंचर) या संस्थेला देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
खा.चंद्रकांत खैरे गटाला आ. संजय शिरसाट गटाने पथदिव्यांच्या कंत्राटात जोरदार शॉक दिल्याची चर्चा आहे. समांतर जलवाहिनीचे कंत्राट खाजगी संस्थेला दिल्यानंतर शहर उजळवण्यासाठीही बीओटीवर कंत्राट देण्यात आले आहे. सभापती विजय वाघचौरे व सदस्यांचे मत ऐकून प्रस्तावाला मंजुरी दिली. १९ महिन्यांच्या काळात आयुक्तांनी दोन वेळेस स्थायी समितीच्या बैठकीला हजेरी लावली.
अशी आहे निविदा
४० हजार एलईडी पथदिवे लावण्यासाठी ८६ कोटी ९३ लाख १७ हजार ४०० रुपये, इन्फास्ट्रक्चर विकसित करण्यासाठी २५ कोटी २८ लाख ५० हजार ६८० रुपये. दोन्ही मिळून ११२ कोटी २१ लाख ६८ हजार रुपये. बीओटी कालावधी ९६ महिन्यांचा असेल. ३ महिन्यांचा प्रिपेटरी कालावधी आहे. २ कोटी ७२ लाख रुपये दरमहा कं त्राटदाराला मनपा देईल.
मनपाच्या फायद्याचा दावा
पथदिवे बसविण्यासाठी पालिकेला २६१ कोटी १२ लाख रुपये लागले असते. १० वर्षांत ४४ कोटी ५७ लाख रुपयांचे वीजबिल द्यावे लागले असते. देखभाल दुरुस्तीसाठी ९ कोटी १२ लाख असे ३१४ कोटी ८१ लाख ९२ हजार पालिकेला लागले असते.
सदस्य तुपे, काशीनाथ कोकाटे म्हणाले, मनपाने सध्या उभारून ठेवलेल्या खांबांचे व इतर साहित्याचे काय होणार आहे. यावर शहर अभियंता पानझडे म्हणाले, पथदिवे काढून गोदामात जमा करून त्याचा लिलाव होईल.
कंत्राटदार काय करणार
पथदिव्यांचे कंत्राट घेतलेली कंपनी वीज बचत करणार आहे. पथदिव्यांचे वीजबिल ३८ लाखांच्या वर गेल्यास कंत्राटदार स्वत: रक्कम भरेल. दरमहा २ कोटी ७२ लाख रुपये कंत्राटदाराला पालिका अदा करील. जुनी यंत्रणा अपडेट करील.
सध्या १ कोटी रुपये वीजबिल मनपा भरते. रोज पथदिवे सुरू व बंद करण्याची जबाबदारी कंत्राटदाराकडे असेल. पथदिव्यांच्या खांबांवरील जाहिरातांचे उत्पन्न कंत्राटदाराला मिळेल.
शहरातील मुख्य रस्त्यावरील खांब बदलणे, स्वीच बॉक्स, केबल टाकण्याचे काम १ वर्षात कंत्राटदार करील. त्यानंतर वॉर्डातील इन्फ्रा बदलण्याचे काम सुरू होईल. असे शहर अभियंता पानझडे यांनी सांगितले.
जातानाही दिला दणका
मावळते आयुक्त डॉ.कांबळे आणि खा. खैरे यांचे १९ महिन्यांत कधीही जमले नाही. जातीवादाचे, समांतर जलवाहिनी योजनेच्या विरोधात असल्याचे खापर आयुक्तांवर वारंवार फोडण्यात आले. भूमिगत गटार योजनेत एल अॅण्ड टी या संस्थेच्या बाजूने सत्ताधारी होते; मात्र आयुक्तांनी खिल्लारी इन्फ्रा या संस्थेला कंत्राट दिले.
पथदिव्यांच्या कंत्राटातही पुण्याच्या एका संस्थेसाठी सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न केले; मात्र ती संस्था शर्यतीत पुढे आलीच नाही. आयुक्तांनी जाता-जाता सत्ताधाऱ्यांना दणका दिल्याचे स्पष्ट झाले. पथदिव्यांचे कंत्राट घेतलेली कंपनी दिल्लीची असून सेना नेत्यांची त्या संस्थेने दिल्लीत साधी भेटही घेतली नाही. त्याचीही खंत सत्ताधाऱ्यांच्या एका गटात आहे.