बंडावर मौन बाळगत दोन्ही काकांचे विकासावर भाष्य !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2016 00:32 IST2016-11-16T00:32:58+5:302016-11-16T00:32:05+5:30
बीड पुतण्याच्या बंडामुळे कौटुंबिक कलहामध्ये सापडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नेते आज एकाच व्यासपीठावर आले खरे, परंतु दोघांनीही पुतण्यांच्या बंडासंदर्भात कोणतेही भाष्य केले नाही.

बंडावर मौन बाळगत दोन्ही काकांचे विकासावर भाष्य !
प्रताप नलावडे बीड
पुतण्याच्या बंडामुळे कौटुंबिक कलहामध्ये सापडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नेते आज एकाच व्यासपीठावर आले खरे, परंतु दोघांनीही पुतण्यांच्या बंडासंदर्भात कोणतेही भाष्य केले नाही. विकासाच्या मुद्यांवर बोलत त्यांनी रा.कॉ. च्या प्रचाराचा नारळ फोडला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि उपनेते जयदत्त क्षीरसागर हे दोघेही सध्या पुतण्यांच्या बंडामुळे त्रस्त आहेत. बीडमध्ये पुतणे संदीप क्षीरसागर यांनी घरातच बंडाचे निशाण फडकावत डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या विरोधात नगरपालिका निवडणुकीत उडी घेतली आहे. तर सुनील तटकरे यांचे पुतणे संदीप तटकरे यांनी काका विरोधात बंड करीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
मंगळवारी रा.कॉ. च्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी तटकरे आणि क्षीरसागर एकाच व्यासपीठावर होते. कौटुंबिक बंडाने घायाळ झालेल्या दोन्ही काकांकडून यासंदर्भात नेमके काय स्पष्टीकरण असेल याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. परंतु जयदत्त क्षीरसागर यांनी आपण पक्षाची निष्ठा जपली असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचाच प्रचार करणार असल्याचे सांगितले. तटकरे यांनी आज जे पक्षासोबत आहेत, तेच उद्याही असतील, इतकेच काय ते सूचक विधान केले.
दोघांनीही अतिशय संयमी भूमिका घेत, या गृहकलहाचा उल्लेख टाळला. जयदत्त क्षीरसागर यांनी पालिकेच्या विकासाचे मुद्दे मांडत सत्तेत असताना पालिकेच्या माध्यमातून विकास कसा साधला याची मांडणी आपल्या भाषणातून केली. बीड शहराला शांतताप्रिय नेतृत्व हवे असल्याचे सांगत डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या आजवरच्या कामाचे कौतुक केले. तटकरे यांनीही आपल्या भाषणातून विकास कामांचा मुद्दाच प्रभावीपणे मांडला.