रंगोत्सवाला उधाण
By Admin | Updated: March 12, 2017 23:24 IST2017-03-12T23:23:58+5:302017-03-12T23:24:45+5:30
जालना: शहरासह जिल्ह्यात रंगोत्सवाला उधाण आले

रंगोत्सवाला उधाण
जालना: शहरासह जिल्ह्यात रंगोत्सवाला उधाण आले असून बच्चे कंपनीसह अबालवृद्धांनी रविवारी सकाळपासूनच विविध रंगांची उधळण केली. शहरातील रंगगाड्याने शहरवासियांना रंगांनी अक्षरश: ओले केले. सोमवारी धूळवड होत असल्याने रविवारीच उत्साह शिगेला पोहचला होता.
होळी आणि धूलिवंदन हा उत्साहाचा क्षण सर्व राग व कटूता विसरून रंग खेळण्याची प्रथा आहे. गत अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा रंगांचा क्षण आला आणि रविवार सुटी असल्याने ठिकठिकाणी लहान मुले, युवक- युवती तसेच वयोवृद्धांनी अत्यंत जल्लोषात कोरडा तसेच फुलांची उधळण करीत होळीच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या. बच्चे कंपनीच्या ओल्या रंगांनी अनेकांचा चेहरा रंगीबेरंगी झाला होता. गत काही वर्षांत कोरड्या रंगांचा वापर वाढल्याने होळी खेळणाऱ्यांची संख्या वाढल्याचे चित्र होते. ओल्या रंगांचा अनेकांना आवड नसल्याने ते पिकनीक स्पॉट अथवा भूमिगत होत. मात्र कोरड्या रंगांमुळे आज अनेकांनी अगदी उत्साहात व नाचत रंगांची उधळण केली. जालना शहरात शोला चौकापासून पारंपरिक रंगगाडा काढण्यात आला.
नवीन जालना भागातील अनेक मार्गावरून फिरून नागरिकांना रंग लावण्यात आला. शहरातील विविध चौक, नगरे, वसाहतींमध्ये रविवारी दिवसभर रंगांची उधळण सुरू होती. सोमवारी धूळवड साजरी होत असल्याने खरा उत्साह शिगेला पोहचणार आहे. अनेकांनी धूळवडीचे स्पेशल नियोजन केले आहे. सोमवारी सकाळी हत्ती रिसाला मिरवणूक कादराबाद परिसरातून निघेल. रंगाऐवजी फुलांची उधळण करण्याचा निर्णय समितीच्या वतीन घेण्यात आला आहे. ही मिरवणूक विविध मार्गांवरून जाते. महिला मंडळानींही धूलिवंदनासाठी तयारी केली असल्याचे सांगण्यात आले.