मौजमजेसाठी कॉलेजकुमार वळाले गुन्हेगारीकडे

By Admin | Updated: April 27, 2015 01:00 IST2015-04-27T00:34:00+5:302015-04-27T01:00:39+5:30

बीड : शहरातील विप्रनगर व एमआयडीसी भागात दुचाकीवरून जाणाऱ्या व्यापाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून लुटल्याच्या दोन घटना घडल्या होत्या

Collegiologist turned to criminalism for fun | मौजमजेसाठी कॉलेजकुमार वळाले गुन्हेगारीकडे

मौजमजेसाठी कॉलेजकुमार वळाले गुन्हेगारीकडे


बीड : शहरातील विप्रनगर व एमआयडीसी भागात दुचाकीवरून जाणाऱ्या व्यापाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून लुटल्याच्या दोन घटना घडल्या होत्या. येथील पाच आरोपींना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांना यश मिळाले आहे. दरम्यान, टोळीतील चौघे कॉलेजकुमार असून, केवळ मौजमजेसाठी ते गुन्हेगारी मार्गाकडे वळले, अशी माहिती तपासात पुढे आली.
२६ मार्च रोजी व्यापारी बद्रीनाथ नारायण झंवर हे दुकान बंद करून मोटारसायकलवर नगदी ७४ हजार ५०० रूपये घेऊन चालले असताना ब्राह्मणवाडी नाल्याच्या पुलावर तीन चोरांनी मोटारसायकल त्यांच्या गाडीसमोर आडवी लावून चाकूचा धाक दाखवला. मिरचीची पूड तोंडावर टाकून त्यांच्याजवळील पैसे व एक मोबाईल चोरून नेला होता. तसेच २ फेब्रुवारी रोजी जगदीश श्रीराम चरखा हे एमआयडीसी येथून स्कूटीवरून जात असताना शासकीय गोडावूनजवळ चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीला मोटारसायकल आडवी लावून शस्त्राचा धाक दाखवून मिरची पूड डोळ्यात टाकली. त्यांच्या हातातील चार लाख ९० हजार ११० रूपये जबरीने चोरून नेले होते. या प्रकरणी पेठ बीड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोन्ही घटना घडल्यानंतर पोलीस आरोपीच्या शोधात होते.
दरम्यान, शाहूनगरमधील अंबिका चौक भागातून महेश मारूती कसबे व गणेश संजय गरड (रा. वडगाव, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर हल्ली मुक्काम पिंपरगव्हाण रोड, बीड) यांच्याकडे बारकाईने विचारणा केली असता त्यांनी आरोपींची नावे सांगितली. गुन्हा केल्यापासून आरोपी फरार झाले होते. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अधिकारी, कर्मचारी त्यांचा माग काढत होते. सदरील आरोपी हे जालना व तेथून जेजुरी भागात गेले असल्याची माहिती त्यांना मिळाली. तपास पथके पाठवून समाधान खिंडकर, शुभम शिंदे यांना २६ एप्रिल रोजी जालना शहरातील एमआयडीसी, पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथून मोठ्या शिताफीने पकडले. तसेच बाबू मसकर, भारत डोईफोडे व दिलीप नरनाळे यांनाही ताब्यात घेतले. खिंडकर, शिंदे व मसकर यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. डोईफोडे व नरनाळे यांनी जगदीश चरखा यांना मारहाण करून लुटल्याच्या गुन्ह्याची कबूली दिली. आरोपींना गुन्ह्याच्या तपासकामी पेठ बीड येथे हजर करण्यात आले आहे. आरोपींकडून गुन्ह्यातील मुद्देमाल, वापरलेली शस्त्रे हस्तगत करण्याची कारवाई सुरू होती.
ही कारवाई अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, अपर अधीक्षक माधव कारभारी, पोलीस उपअधीक्षक गणेश गावडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. सी. डी. शेवगण, सपोनि राहूल देशपांडे, स्था. गु. शा. चे कर्मचारी विजय जोगदंड, शेख सलीम, तुळशीराम जगताप, कल्याण औटे, मनोज वाघ, भास्कर केंद्रे, बालाजी दराडे, सय्यद जकी, प्रकाश वक्ते, संजय सेलमोहकर, अभिमन्यू औताडे आदींनी केली. (प्रतिनिधी)

Web Title: Collegiologist turned to criminalism for fun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.