नागनाथ मंदिरात रंगीत तालीम
By Admin | Updated: July 12, 2014 00:43 IST2014-07-12T00:43:01+5:302014-07-12T00:43:01+5:30
औंढा नागनाथ : बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा येथील नागनाथ मंदिरामध्ये पुणे बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
नागनाथ मंदिरात रंगीत तालीम
औंढा नागनाथ : बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा येथील नागनाथ मंदिरामध्ये पुणे बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास पोलिसांची रंगीत तालीम घेतली. धार्मिक स्थळावर कुठे अतिरेकी हल्ला झाल्यास तो रोखण्यासाठी यंत्रणा सक्षम आहे की नाही? याची परीक्षा घेऊन सुरक्षेचा आढावाही घेण्यात आला.
औंढा येथील ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरामध्ये बंदूकधारी ४ ते ५ अतिरेक्यांनी प्रवेश करून मंदिरातील ४ भाविक व संस्थानच्या दोन सुरक्षा रक्षकांना ताब्यात घेवून बंदी केल्याचे नाट्य रचण्यात आले होते. ठरल्याप्रमाणे संस्थानचे व्यवस्थापक बंडु काळे यांनी अतिरेकी कारवाईची माहिती पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांना कळविली. त्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक सुधीर दाभाडे, डीवायएसपी निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस यंत्रणेने विशेष योजना आखून बंदी बनवलेल्या भाविकांची अतिरेक्यांच्या तावडीतून सहीसलामत सोडवणूक केली. यासाठी जिल्ह्यातून दहशतवादविरोधी पथक, बॉम्बशोधक, श्वानपथकास मंदिरात पाचारण करण्यात आले होते. यावेळी मंदिरामध्ये लपून बसलेल्या अतिरेक्यांना पकडण्यासाठी डीवायएसपी निलेश मोरे, पोनि लक्ष्मण केंद्रे, सपोनि ज्ञानोबा पुरी, फौजदार सय्यद, एटीएस प्रमुख फौजदार आर. एम. शिवरामवार यांनी सर्व तयारीनिशी अतिरेक्यांवर हल्ला केला. भाविकांना सोडविण्यासाठी बंदुकीतून गोळ्या झाडण्यात आल्या. (आवाज करणाऱ्या) यावेळी चार अतिरेक्यांना कंठस्नान घालून एकास जिवंत पकडण्यात आले. सर्व बंदी भाविकांना सुखरूप सोडविण्यात आले. ही घटना सत्य नसून पुणे येथे घडलेल्या मोटारसायकल बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर तसेच आगामी श्रावणमास यात्रेनिमित्त पोलिसांनी घेतलेली रंगीत तालीम होती. शुक्रवारी सकाळी रंगीत तालीम घेण्यासाठी मंदिराचे सर्व दरवाजे भाविकांसाठी बंद करण्यात आले होते. ही तालीम सकाळी ८.३० ते १०.३० वाजेपर्यंत घेण्यात आली. यामध्ये दहशतवादविरोधी पथक, स्थानिक पोलिस, दंगाविरोधी पथक, बॉम्बशोधक व श्वानपथकाचा समावेश होता. तसेच फौजदार सविता सपकाळ, जमादार नुरखाँ पठाण, शंकर इंगोले, मोडक, दराडे, गोरले, सावळे, शुक्ला, बांगर, गोरे, खिल्लारे, पोले, इंगळे यांच्यासह ५० पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
ही तालीम झाल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. (वार्ताहर)
पुणे बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभुमीवर नागनाथ मंदिरात सुरक्षा वाढविली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांची रंगीत तालीम घेतली.
धार्मिक स्थळावर कुठे अतिरेकी हल्ला झाल्यास तो रोखण्यासाठी यंत्रणा सक्षम आहे की नाही? याची परीक्षा घेण्यात आली.
औंढा येथील नागनाथ मंदिरामध्ये बंदूकधारी ४ ते ५ अतिरेक्यांनी प्रवेश करून मंदिरातील ४ भाविक व संस्थानच्या दोन सुरक्षारक्षकांना ताब्यात घेवून बंदी केल्याचे नाट्य रचण्यात आले होते.
पोलिस यंत्रणेने विशेष योजना आखून बंदी बनवलेल्या भाविकांची अतिरेक्यांच्या तावडीतून सहीसलामत सोडवणूक केली.
शुक्रवारी सकाळी रंगीत तालीम घेण्यासाठी मंदिराचे सर्व दरवाजे भाविकांसाठी बंद करण्यात आले होते.