महाविद्यालयांना १० हजार रुपये दंडच नव्हे; विद्यापीठ युवा महोत्सवाचे संपूर्ण शुल्कच घेणार
By राम शिनगारे | Updated: January 14, 2025 19:12 IST2025-01-14T19:11:02+5:302025-01-14T19:12:04+5:30
सहभागी न होणाऱ्या महाविद्यालयांवर कोट्यवधींचा दंड

महाविद्यालयांना १० हजार रुपये दंडच नव्हे; विद्यापीठ युवा महोत्सवाचे संपूर्ण शुल्कच घेणार
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नुकत्याच झालेल्या केंद्रीय युवा महोत्सवात सहभागी न होणाऱ्या महाविद्यालयांना दहा रुपये दंड आकारण्यात येत होता. मात्र, आता या दंडासोबतच महाविद्यालयांनी युवक महोत्सवासाठी स्वत:कडे जमा करून घेतलेले प्रति विद्यार्थी २५ रुपये शुल्काचे पैसेही विद्यापीठाला द्यावे लागणार असल्याचा निर्णय कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सल्लागार समितीच्या बैठकीत घेतल्याची माहिती विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. कैलास अंभुरे यांनी दिली.
केंद्रीय युवा महोत्सव २५ ते २८ डिसेंबर दरम्यान विद्यापीठात आयोजित केला होता. या महोत्सवासंदर्भात कुलगुरू डॉ. फुलारी यांच्या अध्यक्षस्थेतील सल्लागार समितीची बैठक नुकतीच पार पडली. प्रकुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे, सदस्य सचिव डॉ. कैलास अंभुरे, व्यवस्थापन परिषद सदस्य ॲड. दत्ता भांगे यांच्यासह इतर सदस्यांची उपस्थिती होती. यात महाविद्यालयांवर कारवाईचा बडगा उगारणारे अनेक निर्णय घेतले. महोत्सवात विद्यापीठाशी संलग्न ४७६ पैकी २९१ महाविद्यालयांनी ऑनलाइन नोंदणी केली. १८५ महाविद्यालयांनी त्याकडे दुर्लक्ष केले. या १८५ महाविद्यालयांना प्रत्येकी १० हजार रुपये दंडासोबतच प्रति विद्यार्थ्यांकडून युवा महोत्सवासाठीचे २५ रुपये शुल्कही विद्यापीठ घेणार आहे. त्याशिवाय ऑनलाइन नोंदणी करून प्रत्यक्षात सादरीकरण न करणाऱ्या १०० महाविद्यालयांवरही हीच कारवाई केली. त्यामुळे २८५ महाविद्यालयांना प्रत्येकी १० हजार रुपयांप्रमाणे २८ लाख ५० हजार रुपये दंडासह संबंधित महाविद्यालयातील एकूण प्रवेशित प्रति विद्यार्थ्यांचे २५ रुपये शुल्कही दंड म्हणून विद्यापीठास द्यावा लागणार आहे. त्यामुळे या दंडाची रक्कम लाखांऐवजी कोटीमध्ये जाण्याची अंदाज आहे.
प्राचार्यांसह विद्यार्थी अन् महाविद्यालयांनाही दंड
युवक महोत्सवात उमरगा येथील शिवाजी महाविद्यालय आणि घनसावंगी येथील मॉडेल कॉलेजच्या विद्यार्थी व कलावंतांनी वाद घातला होता. त्यामुळे या महाविद्यालयांच्या प्राचार्यांना प्रत्येक ५० हजार रुपये दंड आणि संबंधित विद्यार्थ्यांना तीन वर्षे तर संघप्रमुखांना तहहयात युवा महोत्सवात प्रवेश बंदी घातली आहे.
खोटी माहिती देणाऱ्या कॉलेजना प्रति विद्यार्थी १० हजार दंड
विद्यार्थ्यांच्या वयासंदर्भात खोटी माहिती देणाऱ्या महाविद्यालयांना प्रतिविद्यार्थी १० हजार रुपये दंड आकारला आहे. त्यामध्ये राजर्षी शाहू महाविद्यालय वाळूजचे २ विद्यार्थी, मॉडेल कॉलेज घनसावंगी २, मत्स्योदरी महाविद्यालय अंकुशनगर १, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स बदनापूर ३, के. टी. पाटील अध्यापक व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय धाराशिव येथील ३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.