महाविद्यालयांचे अहवाल मागविणार
By Admin | Updated: April 16, 2015 01:01 IST2015-04-16T00:02:23+5:302015-04-16T01:01:12+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी किती पात्र प्राध्यापक नियुक्त केलेले आहेत.

महाविद्यालयांचे अहवाल मागविणार
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी किती पात्र प्राध्यापक नियुक्त केलेले आहेत. या अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता किती आहे, यासंबंधीचा अहवाल तातडीने मागविला जाणार असल्याची माहिती ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. कारभारी काळे यांनी दिली.
चार दिवसांपूर्वी मुंबईत मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या वतीने राज्यातील कुलगुरू, ‘बीसीयूडी’चे संचालक, यूजीसीच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत नवीन शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयीन स्तरावर ‘चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम’ची अंमलबजावणी करण्याबाबत विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
यासंदर्भात ‘बीसीयूडी’चे संचालक यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने यापूर्वीच संलग्नित महाविद्यालयांनाही ‘चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम’ लागू करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासंबंधी कार्यवाही सुरू आहे. लवकरच महाविद्यालयीन व विद्यापीठस्तरावरील पदव्युत्तर अभ्यासक्रम एकच राहील. त्यादृष्टीने अभ्यासक्रमाचा आराखडा ठरविण्यासाठी लवकरच बैठक बोलावली जाईल.
डॉ. काळे यांनी सांगितले की, आता ‘चॉईस बेस्ड के्रडिट सिस्टीम’पासून कोणाचीही सुटका नाही. संलग्नित महाविद्यालयांना ही सिस्टीम लागू करावीच लागेल. अन्यथा भविष्यात ‘यूजीसी’च्या अनुदानापासून महाविद्यालयांना वंचित राहावे लागेल. यासाठी अगोदर विषयनिहाय पात्र प्राध्यापकांची नियुक्ती करावी लागणार आहे. त्यासाठी विद्यापीठाने पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविल्या जाणाऱ्या महाविद्यालयांमध्ये किती पात्र प्राध्यापक कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता किती आहे, याचा गोषवारा मागविण्यात येणार आहे.