महाविद्यालयांना राष्ट्रगीताचे फलक लावण्याचा विसर
By Admin | Updated: July 24, 2014 00:38 IST2014-07-24T00:23:05+5:302014-07-24T00:38:59+5:30
औरंगाबाद : महाविद्यालयांच्या आवारात मराठी आणि हिंदी भाषेत जन गण मन हे राष्ट्रगीत फलकावर लावावे, असे आदेश २००४ मध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विद्यापीठांना दिलेले होते

महाविद्यालयांना राष्ट्रगीताचे फलक लावण्याचा विसर
औरंगाबाद : महाविद्यालयांच्या आवारात मराठी आणि हिंदी भाषेत जन गण मन हे राष्ट्रगीत फलकावर लावावे, असे आदेश २००४ मध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विद्यापीठांना दिलेले होते. आजही त्याची अंमलबजावणी झालेली नाही.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाने १२ जून २०१४ रोजी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांत रोज राष्ट्रगीत व्हावे, असा आदेश दिला होता. तो उच्चशिक्षण विभाग आणि विद्यापीठाने महिन्यानंतर महाविद्यालयांना न दिल्याचे ‘लोकमत’ने समोर आणल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
उच्च शिक्षण उपसंचालक विभागांतर्गत ११३ अनुदानित आणि २५२ विनाअनुदानित महाविद्यालये आहेत. शहरातील एकाही महाविद्यालयात १७ फेब्रुवारी २००४ रोजी दिलेल्या आदेशानुसार राष्ट्रगीत दोन्ही भाषेत फलकावर लावलेले नाही. विशेष म्हणजे बहुतांश संस्थांना या आदेशाची काही माहितीच नाही.
प्राचार्यांना आम्ही निवेदन देणार आहोत
महाविद्यालयांनी राष्ट्रगीताचे फलक लावून रोज राष्ट्रगीताचे समूहगान व्हावे. शहरातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना आम्ही निवेदन देणार आहोत. दहा दिवसांत शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास आंदोलन करू.
- संदीप कुलकर्णी, जिल्हा सचिव, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
कारवाई व्हावी
प्रांगणात मराठी आणि हिंदी भाषेत जन गण मन हे राष्ट्रगीत फलकावर लावणे आणि महाविद्यालयात रोज राष्ट्रगीताचे समूहगान करण्याच्या आदेशाकडे अधिकाऱ्यांनी डोळेझाक केली आहे. आदेश अमलात न आणणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
- सचिन निकम, जिल्हाध्यक्ष, रिपब्लिकन विद्यार्थी सेना
फलक लावण्याचे आदेश दिले जातील
शासनाच्या आदेशाप्रमाणे महाविद्यालयांना राष्ट्रगीताचे फलक लावण्याचे आदेश लवकर देण्यात येतील.
डी. आर. माने, कुलसचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी संचालकांशी चर्चा करून सर्व महाविद्यालयांना फलक लावण्याचे आदेश दिले जातील.
डॉ. महम्मद फय्याज,
उच्च शिक्षण सहसंचालक