कॅफोंनी केली जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल
By Admin | Updated: August 9, 2014 00:34 IST2014-08-08T23:25:41+5:302014-08-09T00:34:02+5:30
बीड : जि.प.तील विविध विकास कामात अनियमितता झाल्याचा आरोप करत भाजप पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेले उपोषण शुक्रवारी चौथ्या दिवशी मागे घेण्यात आले.

कॅफोंनी केली जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल
बीड : जि.प.तील विविध विकास कामात अनियमितता झाल्याचा आरोप करत भाजप पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेले उपोषण शुक्रवारी चौथ्या दिवशी मागे घेण्यात आले. मुख्य वित्त व लेखाधिकारी वसंत जाधवर यांनी उपोषणकर्त्यांना गुरुवारी धमकावल्याचे प्रकरण पोलिसात गेल्यानंतर आंदोलनाला वेगळे वळण मिळाले. जाधवर यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाही चुकीची माहिती देऊन दिशाभूल केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
शुक्रवारी आ.पंकजा पालवे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन विचारपूस केली. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. आ. पालवे यांनी त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन भाजपाची भूमिका स्पष्ट केली.
त्या म्हणाल्या, जिल्हा परिषदेत अधिकारी व सत्ताधारी यांचा अनागोंदी कारभार सुरू आहे. त्यांच्या संगणमतानेच कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला. जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमली असली तरी केंद्र सरकारच्या समितीकडून चौकशी झाली पाहिजे. घोटाळेबाजांवर कारवाई होत नाही तोपर्यंत माघार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. या संदर्भात आपण पाठपुरावा करणार असून भ्रष्टाचार करणाऱ्यांना कधीही माफ केले जाणार नाही, असे त्या म्हणाल्या.
भारती- जाधवर यांच्या
बोलण्यात विसंगती
२ आॅगस्ट २०१४ रोजी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जि.प.तील तक्रारीच्या अनुषंगाने बैठक बोलावली होती. यावेळी १३ वा वित्त आयोग व झेडपीआरच्या निधीवाटपाचे ठराव उपलब्ध नाहीत असे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. आर. भारती यांनी सांगितले होते तर कॅफो वसंत जाधवर यांनी ठराव आहेत, असे स्पष्ट केले. त्या दोघांच्या बोलण्यात विसंगती आढळून आली.
जिल्हाधिकाऱ्यांचे लेखी पत्र
जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी गुरुवारी भाजपचे जि.प. सदस्य दशरथ वनवे, गटनेते मदनराव चव्हाण, जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष संतोष हांगे, भाजयुमोचे शहराध्यक्ष शेख फारूक, सुधीर शिंदे यांना एक लेखी पत्र पाठविले आहे. त्यामध्ये त्यांनी आंदोलनाची दखल घेतली असल्याचे नमूद केले आहे. चौकशीसाठी जिल्हा कोषागार अधिकारी, लेखाधिकारी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व माजलगाव तहसीलदार यांची समिती नेमली आहे, असे स्पष्ट केले आहे. मुख्य वित्त व लेखाधिकारी वसंत जाधवर यांनी खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्याचा प्रकारही त्यांनी पत्रात उल्लेखीत केला आहे. (प्रतिनिधी)
४ आॅगस्टपर्यंत ठरावांच्या प्रती सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले होते; पण मुदतीत ठराव उपलब्ध न करुन कॅफो जाधवर यांनी चालढकल केली. त्यानंतर ७ आॅगस्ट रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत ठरावांच्या प्रती देण्यासाठी कॅफो जाधवर यांना संधी दिली. त्यानुसार जाधवर यांनी प्रती सादर केल्याचे सूत्रांनी सांगितले.