आचारसंहितेत मंजूर अर्थसंकल्पावर खडाजंगी
By Admin | Updated: June 23, 2017 00:59 IST2017-06-23T00:58:49+5:302017-06-23T00:59:23+5:30
जालना :अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदी सदस्यांना त्यांच्या गटामध्ये करावयाच्या विकास कामांना पूरक नाहीत, या मुद्यावरून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चांगलीच खडाजंगी झाली.

आचारसंहितेत मंजूर अर्थसंकल्पावर खडाजंगी
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आचारसंहिता काळात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मंजूर केलेला अर्थसंकल्प केवळ खरेदीवर आधारित आहे. अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदी सदस्यांना त्यांच्या गटामध्ये करावयाच्या विकास कामांना पूरक नाहीत, या मुद्यावरून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चांगलीच खडाजंगी झाली. अर्थसंकल्पात योग्य दुरुस्त्यांच्या मागणीसाठी विरोधकांनी तीन वेळा सभात्याग करण्याचा प्रयत्न केला.
जि. प. कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात गुरुवारी दुपारी अडीच वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरुवात झाली. सभागृहात उपाध्यक्ष सतीश टोपे, सभापती रघुनाथ तौर, दत्ता बनसोडे, जिजाबाई कळंबे, मुख्यकार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, वित्ताधिकारी उत्तम चव्हाण यांच्यासह सदस्यांची उपस्थिती होती. सभेच्या सुरुवातीला विरोधी सदस्य राहुल लोणीकर यांनी कर्जमाफीच्या निर्णयाबद्दल सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. यावर आमची भूमिका शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याबरोबर सरसकट कर्जमाफीची असल्याचे अनिरुद्ध खोतकर यांनी सांगितले. उपाध्यक्ष सतीश टोपे यांनी वर्ष २०१७-१८ च्या अर्थसंकल्पास मान्यता देण्याच्या मुद्याचे वाचन करताच राहुल लोणीकर यांनी जोरदार आक्षेप घेतला. पदाधिकारी व अधिकाऱ्यांना अपेक्षित असलेल्या या अर्थसंकल्पामुळे सदस्यांना सर्कलमध्ये सहा महिने एकही विकास काम करता येणार नाही. मंजूर अर्थसंकल्प मान्य नसून त्यामध्ये आमच्या सूचनांनुसार दुरुस्त्या करण्यात याव्यात, अशी मागणी भाजप सदस्यांनी केली. सभागृहात कुठलीच चर्चा न करताच अर्थसंकल्प मंजूर होईलच कसा, याबाबत अध्यक्षांनी खुलासा करण्याची मागणी राहुल लोणीकर यांनी केली. आचारसंहिता काळात १३ फेबु्रवारीच्या शासन निर्णयानुसार मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी अर्थसंकल्प मंजूर केला असून, सभागृहासमोर अवलोकनार्थ ठेवला आहे. तो आम्ही मंजूर केलेला नाही. त्यात योग्य दुरुस्त्या सूचवता येतील, असा खुलासा अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनी केला. यावर समाधान न झालेल्या लोणीकर यांनी अध्यक्ष ताठर भूमिका घेत असल्याचा आरोप करत विरोधी सदस्यांसह तीन वेळा सभात्याग करण्याचा प्रयत्न केला. उपाध्यक्ष टोेपे यांनी खुर्चीवरून खाली येत विरोधी सदस्यांना समजावून सांगत बसण्याची विनंती केली. त्यानंतर राहुल लोणीकर यांनी अर्थसंकल्पातील प्रत्येक मुद्याचे वाचन करत अनेक तरतुदींवर दर्शविलेला खर्च अनावश्यक असून, तो कमी करण्याचे सूचविले. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रबोधन कार्यक्रम, ठिबक सिंचन, कोल्हापुरी गेट बसविणे, शाळेच्या सुरक्षा भिंती यासाठी वाढीव तरतूद सूचवली. शालिग्राम म्हस्के, अवधूत खडके यांनीही काही मुद्यांवर दुरुस्त्या सूचविल्या. सभागृहात केवळ अर्थसंकल्पावर चर्चा सुरू असल्यामुळे अध्यक्षांनी अर्थसंकल्प मंजूर झाला असून, त्यावर चर्चा निरर्थक असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु विरोधी सदस्यांनी त्यांना बोलण्याची संधी दिली नाही. दरम्यान, सभेच्या सुरुवातीला सर्व प्रमुख अधिकाऱ्यांनी सभागृहात प्रथम आलेल्या सदस्यांना आपला परिचय करून दिला.