नारळ दारोदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2016 00:45 IST2016-07-27T00:15:52+5:302016-07-27T00:45:56+5:30

औरंगाबाद : एरव्ही मंदिरांच्या बाहेर १५ ते २० रुपयांना मिळणारे नारळ सध्या दारोदारी १० रुपयात मिळत आहेत. ‘लो दस रुपयेमें नारल’ असे ओरडून हातगाडीवाले नारळ विक्री करीत आहेत.

Coconut shell | नारळ दारोदारी

नारळ दारोदारी


औरंगाबाद : एरव्ही मंदिरांच्या बाहेर १५ ते २० रुपयांना मिळणारे नारळ सध्या दारोदारी १० रुपयात मिळत आहेत. ‘लो दस रुपयेमें नारल’ असे ओरडून हातगाडीवाले नारळ विक्री करीत आहेत.
केवळ १० रुपयांना नारळ मिळत असल्याने हातोहात विक्री होत आहे. एरव्ही हातगाड्यांवर केळी, सफरचंद विक्री करणारे सध्या स्वस्त आणि मस्त नारळ विकून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. शहरात तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून नारळाची आवक होत आहे. या राज्यांत नारळाचे उत्पादन चांगले झाले आहे. मागील महिन्यात १ हजार रुपये शेकड्याने विक्री होणारे नारळ सध्या ७०० रुपयांत विक्री होत आहेत. हेच नारळ खरेदी करून हातगाडीवाले किरकोळमध्ये १० रुपये नगाने दारोदारी विकत आहेत. होलसेल विक्रेत्यांनी सांगितले की, हलक्या व भारी प्रतीचे नारळ बाजारात उपलब्ध झाले आहेत. बाजारात ७०० रुपयांपासून ते १६०० रुपयांपर्यंत प्रतिशेकडा नारळ विकत आहेत. त्यात तामिळनाडूतून आलेले नारळ नवीन व लहान आकारातील आहे. हे नारळ ८ दिवस टिकते. यानंतर ते खराब होऊन जाते. बाजारात आजही १३०० व १६०० रुपये प्रतिशेकडा नारळ उपलब्ध असून ते १५ ते २० रुपये प्रतिनगाने विकले जात आहेत. दर आठवड्याला मोंढ्यात एक ते दीड लाख नारळाची आवक होत आहे. आता श्रावण महिना सुरू होत असून या काळात नारळाची विक्री वाढणार आहे. किरकोळ विक्रेता शेख खलील याने सांगितले की, दोन आठवड्यांपूर्वी मी हातगाड्यांवर केळी विकत होतो. मात्र, नारळ ७ रुपयांत मिळू लागल्याने १० रुपयांत विकणे परवडत आहे. दररोज ८० ते १०० नारळ एका हातगाडीवर विकले जात आहेत. शहरात ६० ते ७० हातगाड्यांवर विक्री केली जात आहे.

Web Title: Coconut shell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.