कोळपे-पाटील मल्टीस्टेटचे साहित्य जप्त
By Admin | Updated: November 25, 2015 23:20 IST2015-11-25T23:09:28+5:302015-11-25T23:20:24+5:30
वलांडी : येथील मार्केट यार्डात असलेल्या कोळपे-पाटील क्रेडिट को-आॅपरेटिव्ह मल्टीस्टेटमधील साहित्याच्या जप्तीची कारवाई बुधवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली

कोळपे-पाटील मल्टीस्टेटचे साहित्य जप्त
वलांडी : येथील मार्केट यार्डात असलेल्या कोळपे-पाटील क्रेडिट को-आॅपरेटिव्ह मल्टीस्टेटमधील साहित्याच्या जप्तीची कारवाई बुधवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
देवणी तालुक्यातील वलांडी येथे कोळपे-पाटील क्रेडिट को-आॅपरेटिव्ह मल्टीस्टेटची शाखा आहे. या शाखेअंतर्गत गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने बुधवारी रात्री उशिरा मल्टी स्टेटमधील साहित्याच्या जप्तीची कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात एकूण २२ शाखा असून, १६ शाखांमधील गुंतवणूकदारांच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. त्यापैकी पाच शाखांतील साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून वलांडी येथील ही शाखा कुलूपबंदच होती. परिणामी, गुंतवणूकदारांमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले. शेवटी गुंतवणूकदारांनी पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदविली. बुधवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने वलांडीतील या शाखेतील एक संगणक, नोटा मोजण्याची मशीन, तिजोरी, टेलिफोन, रजिस्टर, कॅशबुक, व्हाऊचर, हजेरीपत्रक, चार टेबल आदी ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
वलांडीतील ही शाखा डिसेंबर २०१४ पासून बंद असल्याचे गुंतवणूकदारांनी सांगितले. या प्रकरणी महाराष्ट्र ठेवीदार हित संरक्षण कायद्याअन्वये कलम ४०६, ४२०, ४०९, ३४ भादंविप्रमाणे संचालकांविरुद्ध गुन्हा नोंद आहे.